
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध खनिज उत्खनन, बेकायदेशीर वृक्षतोड तसेच सपाटीकरणाच्या नावाखाली होत असलेल्या खोदकाम प्रकरणांबाबत माजी आमदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते परशुराम उपरकर यांनी मंगळवारी तहसीलदार राहुल गुरव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी उपरकर यांनी तालुक्यातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत उत्खननाच्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विशेषतः आडाळी, सासोली परिसरात सुरू असलेल्या उत्खनन व वृक्षतोडीबाबत वन विभागाला तत्काळ पत्र पाठवून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. आडाळी औद्योगिक विकास क्षेत्रात काही भूखंडधारकांकडून बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आणून देत, संबंधित भूखंड वितरित झाले असल्यास त्या मालकांना नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच सपाटीकरणाच्या नावाखाली परप्रांतीय धनाढ्य व्यक्तींकडून सुरू असलेल्या बेकायदेशीर कामांवर तातडीने आळा घालण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मोरगाव, सासोली, आडाळी, पडवे, माजगाव आदी भागांतील अवैध उत्खनन तसेच जप्त करण्यात आलेल्या खनिज साठ्यांबाबत कोणती कारवाई करण्यात आली, यासंदर्भात उपरकर यांनी माहिती अधिकारांतर्गत तहसील कार्यालयाकडे अर्ज दाखल केले होते. काही माहिती अपूर्ण असल्याने त्यांनी प्रत्यक्ष तहसीलदारांची भेट घेऊन माहितीची विचारणा केली. यावेळी उर्वरित माहिती लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे तहसीलदारांनी सांगितले. उपरकर यांनी पुढे सांगितले की, गौण खनिजांची वाहतूक ही सुर्योदय ते सूर्यास्त या कालावधीतच होणे अपेक्षित आहे. रात्रीच्या वेळी होणारी वाहतूक ही नियमबाह्य असून त्यावर दंडात्मक कारवाई करावी. तसेच आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त घेऊन अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणीही त्यांनी केली.
तालुक्यातील अनेक भाग वनसंज्ञेखाली येत असून, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे उत्खनन करण्यास शासनाने बंदी घातली आहे. तरीदेखील असे प्रकार कसे घडत आहेत, असा सवाल उपस्थित करत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही उपरकर यांनी सांगितले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संजय गवस, नगरसेवक चंदन गावकर, मिलिंद नाईक, विजय जाधव, लक्ष्मण आयनोडकर तसेच श्री. कासार व श्री. सुतार आदी उपस्थित होते.










