LIVE UPDATES

'सारस्वतांच्या गोड आठवणी ' साहित्यिक प्रकल्पाचे बक्षीस वितरण

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 21, 2026 16:05 PM
views 22  views
#kokansadlive#news update#konkan update#

दोडामार्ग : 'सारस्वतांच्या गोड आठवणी 'या दहावीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या साहित्यिक प्रकल्पाचे बक्षीस वितरण नुकतेच नूतन विद्यालय कळणे या प्रशालेत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक महेंद्र देसाई, ज्येष्ठ शिक्षक प्रशांत राऊळ, उमेश देसाई, संजय तायवाडे, अच्युत गावडे, भरत दळवी, निकिता सावंत, राजश्री देसाई, मधुकर गावकर, संदीप दळवी, कार्यक्रमाचे संयोजक मराठी विषय शिक्षक  सतीश धर्णे आदी उपस्थित होते. 

          यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी साहित्य क्षेत्रातील नामवंत लेखक कवींचा जीवन प्रवास, त्यांचे लेखन,  त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांच्या लेखनातून निर्माण होणाऱ्या सामाजिक जाणीवा, नाटक,कविता, प्रवास वर्णन या सर्वांची साचेबद्ध मांडणी करून उत्तम प्रतीचा प्रकल्प तयार केला होता. या प्रकल्पाला विद्यार्थ्यांनी दिलेली संदर्भसूची उल्लेखनीय आहे तसेच विद्यार्थ्यांनी प्रचंड परिश्रम घेऊन तयार केलेले हे प्रकल्प म्हणजे एक साहित्यिक मेजवानीच आहे असे उद्गार मान्यवरांनी काढले.

 या प्रकल्पात विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, शांता शेळके, ग. दि माडगूळकर, बा. भ. बोरकर, नारायण सुर्वे, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, पद्मा गोळे, नीरजा, जगदीश खेबुडकर अशा नामवंत मराठी साहित्यिकांच्या साहित्याचा प्रकल्पात आढावा घेतला.यात आर्या आप्पाजी गवस हिने प्रथम, प्रतीक्षा रुपेश जाधव हिने द्वितीय, अंश्रिता संजय जाधव हे तृतीय तर दक्षता किशोर नाईक, मयुरी रामचंद्र गावकर, श्रृती चंद्रशेखर कळणेकर, राजू रुपेश जाधव यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले. सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता सावंत यांनी तर आभार सतीश धर्णे यांनी मानले.