
कुडाळ : ओरोस जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय वातावरण आता कमालीचे तापू लागले आहे. शिवसेना (उबाठा) आणि इतर पक्षांच्या उमेदवारीनंतर आता माजी सरपंच प्रीती देसाई यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली आहे. प्रीती देसाई यांच्या एन्ट्रीमुळे ओरसमध्ये आता तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.
तगडा जनसंपर्क आणि सरपंचपदाचा अनुभव- प्रीती देसाई यांनी यापूर्वी ओरोस ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषवले आहे. सरपंच म्हणून काम करताना त्यांनी राबवलेले उपक्रम आणि गावातील प्रत्येक कुटुंबाशी असलेला त्यांचा वैयक्तिक संपर्क ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जाते. प्रशासकीय कामाचा अनुभव आणि महिला मतदारांमधील त्यांची लोकप्रियता पाहता, त्या प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे करू शकतात.
'खुला प्रवर्ग' आरक्षणामुळे संधी- ओरस जिल्हा परिषद मतदारसंघाचे आरक्षण खुला (Open) प्रवर्ग झाल्यामुळे इच्छुकांनी दंड थोपटले आहेत. राजकीय पक्षांच्या गणिता पलीकडे जाऊन, स्थानिक विकास आणि जनतेचा आवाज मांडण्यासाठी प्रीती देसाई यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.











