LIVE UPDATES

स्थानिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा वाढता कल समाधानकारक

जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत यांचे प्रतिपादन ; वेंगुर्लेत पहिल्या अद्ययावत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 18, 2026 17:54 PM
views 35  views

वेंगुर्ला : प्राथमिक शाळांकडे यावर्षी विद्यार्थ्यांचा वाढता कल दिसून येत असून, ही समाधानाची बाब आहे. शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पालकांनी केवळ बाह्य आकर्षणाला भुलून आपल्या पाल्यांना दूरच्या शाळांमध्ये पाठविण्यापेक्षा स्थानिक शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विचार करावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.

 महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे यांच्यातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजूर झालेल्या चार अद्ययावत संगणक प्रयोगशाळांपैकी वेंगुर्ला तालुक्यातील पहिली ‘अद्ययावत संगणक प्रयोगशाळा’ शहरातील जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला क्र. १ येथे साकारण्यात आली. या प्रयोगशाळेचे उद्घाटन मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते तर शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे.

    उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रमोद कामत यांनी शाळा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक केले. पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन हा शैक्षणिक विकासाचा महत्त्वाचा समन्वय असून, या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून शाळेची गुणवत्ता आणि पटसंख्या वाढू शकते, असे त्यांनी सांगितले. 

डिजिटल शिक्षणाला प्राधान्य द्या : प्रितेश राऊळ 

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळण्यासाठी डिजिटल शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. संगणक प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा मिळणार आहे. मात्र, सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच तिची योग्य देखभाल व निगा राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना संगणक व डिजिटल तंत्रज्ञानासोबत शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा विषयांचे ज्ञान मिळणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले ज्ञान विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहते. त्यामुळे प्रयोगशाळेचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपयोग करावा, असे मार्गदर्शन प्रितेश राऊळ केले. 

तसेच यावेळी पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी वेंगुर्ला तालुक्यातील पहिली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौथी अद्ययावत संगणक प्रयोगशाळा सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मराठी माध्यमाच्या शिक्षणाला मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानकौशल्यात निश्चितच भर पडेल, असे त्यांनी सांगितले. शाळेची चांगली पटसंख्या, विद्यार्थ्यांमधील उत्साह आणि शिक्षकांचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. 

    नगराध्यक्ष दिलीप ऊर्फ राजन गिरप यांनी मराठी माध्यमाच्या शाळांची घटणारी पटसंख्या थांबवून ती वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले. पूर्वी अनेक शाळांमध्ये ३०० पर्यंत विद्यार्थी असायचे. मात्र, कालांतराने ही संख्या कमी होत गेली. त्यामुळे पटसंख्या किमान स्थिर ठेवून भविष्यात ती वाढविण्यासाठी शिक्षक, पालक आणि समाजाने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

इंग्रजी माध्यमात गेल्यानंतरच मुलांचे भविष्य घडते, ही पालकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊनही विद्यार्थी विविध क्षेत्रांत यश मिळवू शकतात. आधुनिक डिजिटल सुविधा आणि दर्जेदार शिक्षण मराठी शाळांमध्ये उपलब्ध करून दिल्यास पालकांचा विश्वास वाढेल, असे गिरप यांनी स्पष्ट केले.

    ॲड. नकुल पार्सेकर यांनी शाळेच्या ऐतिहासिक परंपरेचा गौरव केला. सुमारे १८० वर्षांची परंपरा असलेल्या या शाळेत बॅ नाथ पै सारख्या नामवंत व्यक्तींनी शिक्षण घेतले असल्याने या ज्ञानमंदिराला विशेष महत्त्व आहे. अशा ऐतिहासिक शाळेत अद्ययावत संगणक प्रयोगशाळा सुरू होणे ही अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले.

    यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, नगरसेविका ॲड. सुषमा प्रभुखानोलकर, नूतन गटशिक्षणाधिकारी अजय दाणे, भाजप वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पप्पू परब, दोडामार्ग युवा उद्योजक दत्तात्रय ऊर्फ बाबा टोपले, नगरसेवक प्रणव वायंगणकर, वाफोली उपसरपंच विनेश गवस, मच्छिमार नेते वसंत तांडेल, केंद्रप्रमुख विश्वनाथ जगताप, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभिषेक वेंगुर्लकर यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

    या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. शाळेच्या प्रगतीसाठी व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक आणि समाजाने एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचे मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पिळणकर यांनी केले, तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभिषेक वेंगुर्लकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार मानले.

वेंगुर्ला तालुक्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी संधी उपलब्ध करून देणारी ही अद्ययावत संगणक प्रयोगशाळा शाळेच्या शैक्षणिक विकासासोबतच मराठी माध्यमाच्या शाळांची गुणवत्ता आणि पटसंख्या वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.