
पणजी : गोवा ते गणपतीपुळे आणि परत अशी नवीन आंतरराज्य बससेवा कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (KTCL) माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते तसेच परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांच्या प्रमुख उपस्थितीत १४ ऑगस्ट रोजी पणजी येथील कदंबा बसस्थानकावर या नव्या बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. या बससेवेमुळे गोवा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना थेट बससेवेने जोडले जात असून, गणपतीपुळे यात्रेसह पर्यटन आणि धार्मिक प्रवासासाठी प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
या उद्घाटन सोहळ्यास कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष उल्हास तुयेकर, उपाध्यक्ष कृतेश गावणकर, परिवहन विभागाचे सचिव एम. शंभू (IFS), परिवहन संचालक अरविंद खुटकर, केटीसीएल संचालक मंडळाचे सदस्य कपिल सरदेसाई, व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर, महाव्यवस्थापक महेंद्र पेडणेकर, डीटीओ अँड्र्यू परेरा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
असा आहे मार्ग
ही बससेवा पणजी येथून दुपारी १.१५ वाजता सुटणार असून म्हापसा, पर्वरी, करासवाडा चार रस्ता, कोलवाळ, धारगळ, पेडणे, तोरसे मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करेल. त्यानंतर बांदा, सावंतवाडी, कुडाळ, ओरोस, कसाल, कणकवली, नांदगाव, तळेरे, खारेपाटण, राजापूर, ओणी, वाटूळ, लांजा, पाली, रत्नागिरी रेल्वे स्थानक आणि रत्नागिरी असा मार्गक्रमण करत ही बस गणपतीपुळे येथे पोहोचणार आहे.
सिंधुदुर्गातील या ठिकाणी थांबे
गोव्याहून येताना बस बांदा येथे दुपारी २.४५, सावंतवाडी ३.३०, कुडाळ ४.००, ओरोस ४.२०, कासाल ४.३०, कणकवली ५.००, नांदगाव ५.२०, तळेरे ५.३० आणि खारेपाटण ५.४५ वाजता पोहोचणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना गणपतीपुळे जाण्यासाठी गोवा मार्गे थेट बससेवेचा पर्याय उपलब्ध झाला आहे. यानंतर बस राजापूर येथे सायंकाळी ७ वाजता, ओणी ७.२०, वाटूळ ७.३०, लांजा ८, पाली ८.०५, रत्नागिरी रेल्वे स्थानक ८.१५ आणि रत्नागिरी ८.३० वाजता पोहोचेल.
गणपतीपुळ्याहून सकाळी परतीची सेवा
गणपतीपुळे येथून गोव्याच्या दिशेने परतीची बस सकाळी ७.१० वाजता सुटणार आहे. ही बस धामणसे फाटा, जाकादेवी, करबडे फाटा, हातखंबा मार्गे रत्नागिरी येथे सकाळी ८.३० वाजता पोहोचेल. पुढे पावस ९.००, कळशी ९.२०, आडिवरे ९.४०, धारतळे ९.५०, साळगाव १०.००, राजापूर १०.३०, खारेपाटण १०.४५, तळेरे ११.२० आणि कणकवली येथे दुपारी १२ वाजता बस पोहोचणार आहे. पुढे ही बस सिंधुदुर्गमार्गे गोव्याच्या दिशेने रवाना होणार आहे.
धार्मिक पर्यटनाला मिळणार चालना
गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक आणि पर्यटनस्थळ असून, गोव्यातून गणपतीपुळ्याला जाणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत या प्रवासासाठी विविध ठिकाणी बस किंवा इतर वाहतुकीची साधने बदलावी लागत होती. मात्र, आता कदंबा ट्रान्सपोर्टच्या या थेट आंतरराज्य बससेवेमुळे गोवा–सिंधुदुर्ग–रत्नागिरी– गणपतीपुळे असा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
विशेषतः बांदा, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आणि रत्नागिरी परिसरातील प्रवाशांसाठी ही बससेवा महत्त्वाची ठरणार असून, गोवा आणि कोकणातील धार्मिक व पर्यटनस्थळांमधील दळणवळणाला यामुळे अधिक चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. “गणपती बाप्पा मोरया!”च्या जयघोषात सुरू झालेल्या या नव्या बससेवेमुळे गोवा आणि कोकणातील प्रवाशांना थेट, सोयीस्कर आणि नियमित सार्वजनिक वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.










