LIVE UPDATES

कॉपी प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढली

आणखी काहींवर गुन्ह्याची शक्यता
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 19, 2026 11:36 AM
views 208  views

वैभववाडी : भुईबावडा दहावी परीक्षा केंद्रावरील गाजलेल्या कॉपी प्रकरणाच्या तपासात नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुख्य सूत्रधार म्हणून अटक करण्यात आलेले उंबर्डे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय राठोड यांच्या चौकशीत आणखी दोघांचा थेट सहभाग समोर आला असून, त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  यापूर्वी या प्रकरणात संबंधित विद्यार्थ्याचे पालक, मुख्याध्यापक संजय राठोड, पर्यवेक्षक संजय आडे आणि पुरवण्या लिहिणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १५ जुलै रोजी पोलिसांनी संजय राठोड यांना अटक केली. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची कसून चौकशी सुरू असून, त्यातून तपासाला महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत.पोलिस तपासानुसार, परीक्षा केंद्राबाहेर उभ्या असलेल्या एका वाहनात बसून संबंधित विद्यार्थ्याच्या सातही पुरवण्या लिहिण्यात आल्या. यापैकी तीन पुरवण्या एका अल्पवयीन मुलाने, तर उर्वरित चार पुरवण्या संजय राठोड यांनी गुगलच्या मदतीने लिहिल्याचे निष्पन्न झाले आहे. परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षक संजय आडे आणि एस. एम. लाड यांनी व्हॉट्सॲपद्वारे प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बाहेर पाठवल्याचेही तपासात समोर आले आहे.या प्रकरणातील अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी पोलिसांनी नोटीस बजावली असून, त्याच्याकडूनही माहिती घेण्यात येणार आहे. तपास जसजसा पुढे जात आहे, तशी या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून आणखी काही जणांचा थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

 दरम्यान, विभागीय कोकण मंडळाच्या चौकशी अहवालात २५ पैकी २४ जणांवर ठपका ठेवण्यात आला होता. त्यापैकी तिघांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता तपासादरम्यान आणखी एका व्यक्तीचे नाव समोर आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव करीत आहेत.

पर्यवेक्षकांच्या भूमिकेवर संशय

सातही पुरवण्या परीक्षा केंद्राबाहेर लिहून पुन्हा केंद्रात पोहोचविण्यात आल्याचा निष्कर्ष तपासातून समोर आला आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक, केंद्रप्रमुख आणि कस्टीडियन यांच्या भूमिकेबाबतही संशय निर्माण झाला असून, या सर्वांची चौकशी होण्याची शक्यता आहे. 

संजय राठोड याला न्यायालयीन कोठडी

कॉपी प्रकरणातील मुख्य सूत्रधार संजय राठोड याला तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज कणकवली न्यायालयात हजर केले होते.यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन  कोठडी सुनावली आहे.