LIVE UPDATES

पोलिओ डोस मोहिमेसाठी राजकीय पदाधिकारी मैदानात

मालवणात भाजप महिला आघाडीकडून केंद्रांना भेटी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 28, 2026 15:18 PM
views 115  views

मालवण : देशभरात राबविल्या जाणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक पातळीवर या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आणि बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून कामाचा आढावा घेतला. महिला बालकल्याण सभापती तथा भाजप शहराध्यक्षा अन्वेषा आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने शहरातील विविध भागांतील पल्स पोलिओ केंद्रांना भेटी दिल्या.

या दौऱ्यादरम्यान भाजप महिला आघाडीच्या तालुका सरचिटणीस महिमा मयेकर, अमृता फाटक, नगरसेविका महानंदा खानोलकर आणि तारका चव्हाण उपस्थित होत्या.

अन्वेषा आचरेकर आणि त्यांच्या सहकारी महिला पदाधिकाऱ्यांनी विविध केंद्रांवर जाऊन प्रत्यक्ष पोलिओ लसीकरण प्रक्रियेची पाहणी केली. केंद्रावर उपस्थित असलेल्या आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका आणि डॉक्टरांकडून सकाळपासून किती बालकांना डोस देण्यात आला, याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. तसेच मोहिमेत काही अडचणी येत आहेत का, याचीही विचारपूस केली.

या भेटीदरम्यान शहराध्यक्षा अन्वेषा आचरेकर म्हणाल्या, भारताला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी पल्स पोलिओ मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. शहरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकही बालक या डोसपासून वंचित राहू नये, यासाठी आमची संपूर्ण टीम कार्यरत आहे. आरोग्य कर्मचारी सुट्टीच्या दिवशीही देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे.

पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, ज्या पालकांनी काही कारणास्तव आपल्या मुलांना आज केंद्रावर आणले नसेल, त्यांनी पुढील दोन-तीन दिवसांत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गृहभेटी दरम्यान आपल्या पाल्याला आवर्जून पोलिओचा डोस द्यावा. या मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचेही महिला आघाडीच्या तालुका सरचिटणीस महिमा मयेकर यांनी नमूद केले.