
सिंधुदुर्गनगरी : पिंगुळी येथील पाझर तलावाच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या प्रश्नावरून कुडाळमधील राजकीय वातावरण तापले आहे. आमदार निलेश राणे यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी यापूर्वी दोन वेळा बैठका आयोजित केल्या होत्या. मात्र, त्यावेळी उपस्थित न राहणारे विरोधक आता उपोषणाच्या माध्यमातून राजकीय स्टंटबाजी करीत असल्याचा आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साईल आणि जिल्हा परिषद सदस्य केशव नारकर यांनी केला.
“तलावाच्या प्रश्नाबाबत एवढेच गांभीर्य होते, तर आमदारांनी बोलाविलेल्या बैठकांना अनुपस्थित का राहिलात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष दालनात मंगळवारी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत साईल आणि नारकर यांनी पिंगुळी पाझर तलावाच्या प्रश्नावरून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे, जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे आणि मालवण पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण उपस्थित होते.
साईल आणि नारकर म्हणाले की, पिंगुळी येथील पाझर तलाव जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. या तलावातील गाळ काढणे, सौंदर्यीकरण करणे, पाण्याचे प्रदूषण रोखणे आणि पाणीसाठ्याचे संवर्धन करण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी संबंधित प्रशासनाला यापूर्वीच सूचना दिल्या आहेत.
तलावातील पाण्यावर ग्रामपंचायतीची नळपाणीपुरवठा योजना अवलंबून असल्याने नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. तलाव परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करून आवश्यक सुविधा निर्माण करता येतील का, याबाबतही सकारात्मक चर्चा झाली आहे.
तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्नही आमदारांनी गांभीर्याने घेतला असून, संबंधित रस्ता ग्रामपंचायतीच्या ताब्यात जाणारा आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारे अडवू नये, अशा सूचना संबंधित विकासकाला देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तलावाचे संरक्षण, स्थानिक नागरिकांचे हित आणि विकास यांचा समन्वय साधण्याची भूमिका आमदारांनी घेतली आहे. असे असताना विरोधकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. उपोषण सुरू करण्यापूर्वी प्रशासनाशी कोणती चर्चा केली, कोणते प्रश्न मांडले आणि त्यावर काय उत्तरे मिळाली, याची माहिती जनतेसमोर मांडावी, असे आव्हान साईल व नारकर यांनी दिले.
पिंगुळी परिसरातील जमिनी परप्रांतीयांनी लुटल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. मात्र, स्थानिक जमीनमालकांनी स्वतःच्या जमिनी खरेदीदारांना किंवा विकासकांना विकल्या आहेत. कोणाचीही जमीन जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आलेली नाही. त्यामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना जमिनींची लूट असे स्वरूप देऊन जनतेमध्ये गैरसमज निर्माण करणे चुकीचे असल्याचे नारकर म्हणाले.
वैभव नाईक दहा वर्षे या भागाचे आमदार होते. त्यावेळी या प्रश्नांवर त्यांनी आवाज का उठविला नाही, असा सवालही त्यांनी केला.
पिंगुळी परिसर औद्योगिक वसाहतीला लागून असल्याने या भागाच्या विकासाला मोठ्या संधी आहेत. गेल्या दोन वर्षांत आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून औद्योगिक परिसरातील विद्युत रोहित्रे, पाणीपुरवठा, रस्ते आणि उद्योगांसाठी आवश्यक सुविधांवर भर देण्यात आला आहे.
पिंगुळीतील विद्युत कार्यालयाकडून पुढे जाणाऱ्या सुमारे २७ कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. महामार्गावरील वडगणेश परिसरापासून पिंगुळी म्हापसेकर तिठा आणि गणपती मंदिरापर्यंतच्या रस्त्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे नारकर यांनी सांगितले.
पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ परिसराच्या विकासाला चालना मिळत आहे. त्यामुळे विरोधकांनी आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय वातावरण तापविण्याऐवजी विकासकामांमध्ये सहकार्य करावे, असे आवाहन साईल आणि नारकर यांनी केले.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








