
वेंगुर्ला : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने विविध सेवाभावी व समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. रुग्णसेवा, शैक्षणिक सुविधा आणि पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली.
शिवसेनेच्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या मूळ विचारधारेनुसार वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यात विविध उपक्रम घेण्यात आले. वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच तालुक्यातील प्राथमिक शाळांना विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी सीलिंग फॅन भेट देण्यात आले. विविध शाळांमध्ये वृक्षवाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.
यावेळी उपसभापती सचिन देसाई यांनी सांगितले की, नेते किंवा कार्यकर्त्यांचा वाढदिवस केवळ जल्लोषापुरता मर्यादित न ठेवता त्यानिमित्त समाजासाठी काहीतरी उपयुक्त कार्य झाले पाहिजे, या भावनेतून हे उपक्रम राबविण्यात आले आहेत. यापूर्वीही आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिरासारखे उपक्रम घेण्यात आले असून, यापुढेही आरोग्य, शिक्षण आणि समाजोपयोगी क्षेत्रात अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले जातील. वाढदिवसानिमित्त समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपणे हाच या उपक्रमांचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी सांगितले की, शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारानुसार संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांची सेवा, विद्यार्थ्यांची सेवा आणि शाळांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. यापुढेही शिवसेनेच्या माध्यमातून वाढदिवस तसेच विविध प्रसंगी लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या गरजेनुसार शैक्षणिक साहित्य, आरोग्यविषयक मदत आणि अन्य समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतील. समाजसेवेच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार करण्याबरोबरच सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमांमुळे रुग्णांना फळवाटप, विद्यार्थ्यांना शाळांमध्ये आवश्यक सुविधा तसेच वृक्षवाटपाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन अशा विविध स्तरांवर सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सेवाभावी उपक्रमांची जोड देत शिवसेनेने समाजकारणाचा संदेश दिला.
यावेळी शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, नगरसेविका लीना म्हापणकर, महिला तालुकाप्रमुख शीतल साळगावकर, माजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, तालुका सचिव संजय गावडे, सत्यवान साटेलकर, विभागप्रमुख संजय परब, नयन पेडणेकर, मयूर आरोलकर, संतोष परब, संदीप पेडणेकर, प्रथमेश सावंत, उमेश आरोलकर, उमेश नाईक, रोहित रेडकर, श्री वालावलकर, मनिष रेवणकर, जोस्ना केळुसकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संजू परब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हातून समाजोपयोगी कार्य असेच सातत्याने घडत राहावे, अशी सदिच्छाही व्यक्त करण्यात आली.










