
कुडाळ : येथील बॅ. नाथ पै संस्थेच्या बी. एड. महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक संलग्नित ‘पालकत्व शिक्षणक्रम’ आणि ‘मार्गदर्शन समुपदेशन पदविका’ हे नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून, विद्यापीठातर्फे या शिक्षणक्रमांना नुकतीच मान्यता मिळाली आहे.
आजच्या धावपळीच्या युगात पालकांमध्ये निर्माण होणारा ताण-तणाव कमी करण्यासाठी शास्त्रशुद्ध पालकत्त्व रुजविण्याच्या उद्देशाने हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. मुलांच्या वाढीतील प्रत्येक टप्प्यात योग्य निर्णय घेणे, बालकांमधील कौशल्यांचे आकलन करणे, डिजिटल युगातील आव्हानांचा सामना करणे आणि परिवारात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यास हा अभ्यासक्रम मदत करतो.
मार्गदर्शन व समुपदेशन पदविका अभ्यासक्रम
विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वच स्तरांवर वाढणारा ताण-तणाव दूर करण्यासाठी एक वर्षाचा ‘मार्गदर्शन व समुपदेशन’ पदविका शिक्षणक्रम सुरू करण्यात आला आहे. समाजात प्रशिक्षित आणि तज्ज्ञ समुपदेशक (Counselors) तयार करून योग्य दिशा देणारे मनुष्यबळ निर्माण करणे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. या शिक्षणक्रमांचा जास्तीत जास्त पालक व इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, केंद्रप्रमुख परेश धावडे आणि केंद्र समन्वयक नितीन बांबार्डेकर यांनी केले आहे.










