पंचायत समितीची मासिक सभा 23 एप्रिलला

Edited by: विनायक गांवस
Published on: April 22, 2026 17:35 PM
views 85  views

सावंतवाडी : पंचायत समितीची मासिक सभा सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले प्राथमिक शाळा नं. ३ च्या हॉलमध्ये गुरुवार, २३ एप्रिलला सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. 

सावंतवाडी पं. स.चे कार्यालय तालुका स्कूलमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. सभापती व उपसभापती यांची केबिन लवकरच तालुका स्कूलच्या जवळच्या शाळेत करण्यात येणार आहे. सावंतवाडी पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव आहे. नवीन इमारत बांधण्याचे काम लवकरच होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेली सात-आठ वर्ष पंचायत समितीचे कार्यालय होते. आता हे कार्यालय स्थलांतरित करण्यात आले आहे. गेली पाच वर्षे प्रशासक होते.

त्यामुळे सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक झाली नाही. आता लोकराज्य अस्तित्वात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी सावंतवाडी पंचायत समितीमध्ये सभापती उपसभापती आणि सदस्य यांचा कारभार सुरू झाला आहे. पहिली मासिक बैठक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयात छोट्या जागेत घ्यावी लागली. त्याचवेळी पंचायत समितीची पुढील मासिक बैठक कुठे घ्यायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक तीन जगन्नाथराव भोसले या शाळेमध्ये हॉलमध्ये ही सभा होणार आहे. आता यापुढे पंचायत समितीची मासिक बैठक याच ठिकाणी होणार आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन सभापती सुस्मिता जाधव व उपसभापती गौरव मुळीक यांनी केले आहे.