
दोडामार्ग : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतेही जाहीर कार्यक्रम न घेता संपूर्ण जिल्हाभर सेवाभावी उपक्रम राबविण्याच्या सूचनेनुसार दोडामार्ग भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ५२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात कोणतेही जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले नाहीत. त्याऐवजी सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने सातत्याने आपल्या मतदारसंघात लक्ष ठेवले पाहिजे. नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि गरजा समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे हीच खरी लोकसेवा आहे. आमची गरज जिथे असेल तिथे आम्ही निश्चितपणे उभे राहू. मंत्री नितेश राणे यांना निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्य लाभो, हीच सदिच्छा आहे.
रक्तदान शिबिरास तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे, पंचायत समिती सदस्य संजय सातर्डेकर, नगरसेवक नितीन मणेरीकर, संध्या प्रसादी, संजना म्हावळणकर, महिला तालुका अध्यक्षा दिक्षा महालकर, युवा मोर्चा अध्यक्ष पराशर सावंत, दोडामार्ग व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष सागर शिरसाट, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष उदय पास्ते, वैभव इनामदार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरामध्ये युवकांसह विविध स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा करण्याच्या भाजपच्या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असल्याने हा उपक्रम समाजहिताचा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बांबोल गोवा मेडिकल कॉलेजचे रक्तपेढीच्या डॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदात्यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.











