LIVE UPDATES

दाभोलीतील २० लाखांच्या दागिने चोरीचा छडा

घरकाम करणाऱ्या महिलेला अटक | जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांची पत्रकार परिषदेत माहिती | ५१५ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: October 11, 2026 20:51 PM
views 19  views

सिंधुदुर्गनगरी : वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली-मोबारवाडी येथे घरातून चोरीस गेलेल्या सुमारे २० लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा लावण्यात वेंगुर्ला पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी घरकाम करणाऱ्या २७ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेले ५१५ ग्रॅम वजनाचे सर्व सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साठम आणि वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी उपस्थित होते.

दाभोली-मोबारवाडी येथील सलोनी सुधीर लोळयेकर (वय ७२) यांच्या राहत्या घरातून विविध सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. या दागिन्यांचे वजन ५१५ ग्रॅम असून, त्यांची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. याप्रकरणी २३ सप्टेंबर २०२६ रोजी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान तक्रारदार यांच्या घरी घरकाम करणाऱ्या मार्टिना डुमिन लुडिक (वय २७, रा. दाभोली-मोबारवाडी, ता. वेंगुर्ला) हिच्यावर संशय बळावला. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी दिली.

चोरीस गेलेल्या दागिन्यांचा शोध घेतला असता, संशयित महिलेने ते स्वतःच्या राहत्या घराशेजारी असलेल्या पडव्यात ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी दोन पंचांसमक्ष कारवाई करून सर्व दागिने हस्तगत केले. अशा प्रकारे पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची उकल करत सुमारे २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साठम आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस उपनिरीक्षक योगेश कांबळे, पोलीस हवालदार योगेश सरफदार, प्रकाश कदम, आशिष गंगावणे, स्वप्नील तांबे, मनोज परुळेकर, जयराज सरमळकर, सिंधू मंगळ आणि होमगार्ड आरोसकर यांनी ही कारवाई केली.