
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेआगामी भरती परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी विलवडे गावचे सुपुत्र, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ आबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारपासून गेले चार दिवस सीबीडी-बेलापूर येथील एमपीएससीच्या मुख्यालयाबाहेर बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू आहे.
महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या निर्णयाविरोधात विद्यार्थी, पालक, स्पर्धा परीक्षा शिक्षक, अकॅडमी प्रतिनिधी आणि विविध विद्यार्थी संघटनांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. परीक्षा पद्धतीतील बदल करताना विद्यार्थ्यांशी, तज्ज्ञांशी आणि संबंधित घटकांशी पुरेशी चर्चा करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावेळी रामचंद्र दळवी म्हणाले, एमपीएससीची परीक्षा ऑनलाईन न घेता ऑफलाईन घ्यावी या मागणीसाठी राज्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनीही आंदोलनाची भूमिका घेतली असल्याचे सांगून हा लढा कोणत्याही एका संघटनेचा किंवा राजकीय पक्षाचा नसून महाराष्ट्रातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या समान संधी, पारदर्शक परीक्षा व्यवस्था आणि भवितव्यासाठीच असल्याचे सांगितले.
एमपीएससी भरती परीक्षा सीबीटी पद्धतीने घेण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा. सर्व भरती परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन ओएमआर पद्धतीने घ्याव्यात. परीक्षा पद्धतीत बदल करण्यापूर्वी विद्यार्थी, शिक्षक, स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ आणि अकॅडमी प्रतिनिधींशी चर्चा करावी. परीक्षा व्यवस्था पारदर्शक, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक ठेवावी. अशा विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. यावेळी परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, समान संधी आणि विश्वासार्हतेवर विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित करून लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित निर्णय घेताना अधिक व्यापक चर्चा होणे आवश्यक असल्याचे सांगितले.











