
सिंधुदुर्गनगरी : सार्वजनिक वाहतूक सेवेत प्रवाशांशी मराठीतून आत्मीय, नम्र आणि सौजन्यपूर्ण संवाद साधणे ही केवळ भाषेची बाब नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा सन्मान आहे. मराठीचा प्रभावी वापर केल्यास प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होतो, असे प्रतिपादन डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या "महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा" या उपक्रमांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे ऑटो-रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष लोकरे यांनी उपक्रमाची माहिती देत उपस्थितांशी संवाद साधला. मोटार वाहन निरीक्षक निलेश ठोंबरे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमास जिल्हा रिक्षा चालक-मालक सेवा संघटना, सिंधुदुर्ग तसेच कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये अध्यक्ष नागेश ओरोसकर, विजय कांबळी, महेश आंग्रसकर, रवी माने, मंगेश सावंत आणि सुनील पाताडे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना "महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा" या उपक्रमाची माहितीपत्रके वितरित करण्यात आली. तसेच मराठी भाषेचा सन्मान राखत प्रवाशांशी सौजन्यपूर्ण आणि आत्मीयतेने संवाद साधून उत्कृष्ट सेवा देण्याचे आवाहन करण्यात आले.











