
दोडामार्ग : विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय, मेणकुरे-गोवा यांच्या आषाढी एकादशी निमित्त आयोजित पंढरपूर पायी वारीचे रविवारी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. शेकडो वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
यावेळी खासदार सदानंद शेट तानावडे, डिचोली मतदारसंघाचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, गोवा कला व संस्कृती खात्याचे संचालक विवेक नाईक आणि मेणकुरेच्या सरपंच कुमुदिनी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय, गोवा यांच्या वतीने आयोजित ही सलग सहावी पायी वारी असून, मेणकुरे येथील श्री माऊली मंदिरातून दिंडीचे प्रस्थान झाले. वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी भाविक, ग्रामस्थ आणि वारकरी कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माऊली देवस्थान मेणकुरेचे अध्यक्ष सदाशिव नाईक, ज्येष्ठ पत्रकार व निवृत्त शिक्षक दिलीप देसाई, श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष देवानंद नाईक, उपाध्यक्ष अभिजीत तेली, खजिनदार मुकुंद लामगांवकर, सचिव चंद्रकांत वंसकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
११ जुलै रोजी मेणकुरे येथून सुरू झालेली ही वारी सुमारे १३ दिवसांचा पायी प्रवास करून २३ जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे. या वारीत सुमारे २५० वारकरी बंधू-भगिनी सहभागी झाले आहेत. २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केल्यानंतर २६ जुलै रोजी परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे.
संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि वारकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारी शिस्तबद्ध पद्धतीने पुढे जात असून, मेणकुरेहून पुढे धुमासे, साळ, साळ-पाटये पुनर्वसन, दोडामार्ग, झरेबांबर आणि भेडशी आदी ठिकाणी वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.











