
सिंधुदुर्ग : ब्रम्हचर्य म्हणजे अंतिम सत्य मानून ईश्वराच्या, आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या मार्गावर चालणारे अनेक संत, महंत या देशात होऊन गेलेत. समाजाचं, मानवाचं हीत त्यांनी सांगितले म्हणून त्यांना गुरूत्व, दैवत्व लोकांकडून प्राप्त झालं. मात्र, मागच्या काही वर्षांपासून या पवित्र परंपरेला भगव्या कपड्यातील काही वासनांध बाबा-बुवांनी डाग लावण्याचे काम केले आहे. कॅप्टन खरातच्या प्रकरणानंतर अशी इतरही प्रकरण आता बाहेर पडू लागली आहेत. यातच महाराष्ट्र राज्याच्या शेजारील राज्यातील एका 'बाबू'चे पराक्रम उघड झालेत.
काही वर्षांपूर्वी आवश्यक शिक्षण देऊन बाबूची नियुक्ती प्रमुखपदी करण्यात आली होती. यानंतर 'स्वामी' म्हणून तो स्वतःला संबोधायला लागला. मठाच्या आसनावर देखील बसला. मात्र, यातच भगव्या कपड्यातील या बाबूची कामवासना जागृत झाली. इतरवेळी कुणाचा स्पर्शही करून न घेणाऱ्या या बाबूचा हात थेट एका सेवेत असणाऱ्या महिलेवर पडला. या गैरवर्तणूकीबाबत त्या महिलेने स्वतः सर्वांसमोर जाऊन जाहीरपणे हे कृरकृत्य सांगितले. यावेळी त्या वासनांध बाबूनेही आपलं कृरकृत्य मान्य केलं.
या 'बाबू'ला अनेकांनी गुरू मानला होता. विविध राज्यांमध्ये त्याने पदयात्राही काढली होती. पदयात्रांच्यावेळी जागोजागी त्याची स्वागत मिरवणूक, पाद्यपूजा आणि महापूजाही केली गेली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील त्याला मानणारा वर्ग होता. मात्र, त्याच्या या काळ्या कृत्यानंतर सर्वस्तरातून त्याचा निषेध नोंदवला जात आहे. याबाबत एक बैठक नुकतीच राजकीय बदल झालेल्या राज्यात झाली. यावेळी त्या बाबूचे कारनामे निदर्शनास आणले गेले. यानंतर उपस्थितांकडून बाबूच्या फोटोंची मोडतोड करत त्याला पदावरून देखील हटविण्यात आले. आज देशात भोंदू बाबा, मांत्रिक लोकांच्या माध्यमातून भावनिक व अंधश्रद्धेतून भोळ्या भक्तांचा गैरफायदा घेण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. ज्याला गुरूस्थानी मानले असे अशोक खरात आता विविध राज्यात देखील तयार झालेत. मात्र, या पिसाळलेल्या बाबा, बाबूंमुळे हजारो वर्षांची पवित्र भारतीय प्रथा असलेली गुरू परंपरा डागळत चालली आहे. संत परंपरा असलेल्या भूमीला, तपस्वींच्या साधनेला यामुळे डाग लागत असून सर्वांनाच एकाच तराजूत मोजलं जातं आहे.










