
सावंतवाडी : आनंददायी शनिवार अंतर्गत अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला आणि साटम महाराज वाचन मंदिर दाणोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा दाणोली गावठण येथे मराठी साहित्य मंडळाचे सदस्य आणि वाचन मंदिराचे अध्यक्ष भरत गावडे यांनी सानेगुरुजी कथामाला या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली.मुलांशी मुक्त संवाद साधत त्यांनी मुलांना सानेगुरुजींच्या जीवनातील विविध प्रसंग गोष्टीरूपात उलगडून सांगितले.मुलांचा प्रतिसाद मिळवण्यासाठी मुलांना मधेमधे प्रश्नही विचारले.सगळी मुले अगदी मंत्रमुग्ध होऊन कथा ऐकत होती.सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या मुलांना पुस्तके भेट देण्यात आली.मुलांना संस्कारक्षम बनविण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन खूप महत्वाचे आहे.कथा कशी असावी,कशी सांगावी,आणि त्यातून कसे परिवर्तन घडवून आणावे,मुलांवर नकळतपणे आपल्या व्यवहारातून कसे संस्कार घडवावे हा या कथांमालेचा मुख्य उद्देश आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.वेंगुर्लेकर मॅडम यांनी प्रास्ताविक सौ शिर्के मॅडम आणि आभार श्री.चोपडे सर यांनी मानले .










