LIVE UPDATES

कोकणच्या बागायतदारांचा संताप उफाळला

वेंगुर्ल्यातील बागायतदार जलसमाधी आंदोलनात सहभागी होणार
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 27, 2026 11:48 AM
views 21  views

  • संजय गावडेंचा अंतिम इशारा

वेंगुर्ला :  कोकणातील आंबा-काजू बागायतदारांवरील संकट दिवसेंदिवस गडद होत असून सरकारने जाहीर केलेली २२ हजार हेक्टरची तुटपुंजी मदत फेटाळून लावत, वेंगुर्ला तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. "आंब्याला हेक्टरी ५ लाख व काजूला हेक्टरी ३ लाख रुपये नुकसान भरपाई याच अधिवेशनात जाहीर करा, अन्यथा देवगड येथे होणाऱ्या जलसमाधी आंदोलनात वेंगुर्ला तालुक्यातील शेतकरी सहभागी होतील," असे गावडे यांनी स्पष्ट केले.

नुकसान प्रचंड, मदत तुटपुंजी

हवामान बदल व अवकाळी पावसामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्याचे ८० ते ९०% तर काजूचे ६० ते ७०% पीक नष्ट झाले आहे. रत्नागिरीत ५६४२० शेतकऱ्यांचे ४८,७९१.८८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून सिंधुदुर्गातही ७७,५०० हेक्टर क्षेत्र ९०% बाधित आहे. एकूण ४२००० एकर क्षेत्र खराब हवामानामुळे उध्वस्त झाले आहे. 

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव येथे 'हायवे रोको', मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चे काढून हेक्टरी ५ लाख व ३ लाख ची मागणी करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत फक्त २२ हजार प्रति हेक्टर व विमाधारकांना ४२ हजार प्रति हेक्टर मदत जाहीर केली.

"भीक नको पण कुत्रा आवर" : शेतकरी संतप्त

"एका आंब्याच्या झाडाला बहर येण्यापासून ते खत-औषधापर्यंत किमान ४००० रु खर्च येतो. अशावेळी २२० रु झाड मदत म्हणजे 'भीक नको पण कुत्रा आवर' असाच प्रकार आहे," असा संताप गावडे यांनी व्यक्त केला. "शेतकऱ्यांना कागदपत्रांसाठी करावी लागणारी धावपळ व त्यात जाणारा वेळ-पैसा पाहता ही मदत म्हणजे क्रूर चेष्टा आहे."

सरकारवर गंभीर आरोप

गावडे म्हणाले, "मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले गेले नाही. सरकार शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन फक्त तोंडाला पाने पुसत आहे. ४२००० एकर बाधित क्षेत्रापैकी अनेक शेतकऱ्यांनी कोकम, शेतीच्या कामांमुळे व उरलेले पीक वाचवण्याच्या नादात पंचनाम्यासाठी अर्जच केले नाहीत. आम्ही पहिल्यापासून 'सरसकट नुकसान भरपाई' मागितली, पण पंचनाम्याच्या नावाखाली सरकारने चालढकल केली."

निलेश राणेंचे अभिनंदन, पण कृती हवी

"या जिल्ह्याचे आमदार निलेशजी राणे यांनी कृषीमंत्र्यांना खडसावून आंबा-काजू बागायतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला, त्याबद्दल आम्ही संघटनेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो," असे गावडे म्हणाले. "मंत्री नितेश राणे यांनीही 90% नुकसान झाल्याने NDRF पेक्षा जास्त मदत द्यावी अशी मागणी केली आहे. पण घोषणांचे पुढे काय?"

सरकार सुस्त, शेतकरी हतबल

"या अधिवेशनात आपल्याला जाब विचारणार कोणी नाही असे समजून सरकार सुस्त पडले होते. दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडायला सरकारकडे पैसा व वेळ आहे, पण शेतकऱ्यांची कैफियत जाणून घ्यायला वेळ नाही. आंदोलने दडपल्याने शेतकरी हतबल झाला असून सरकार त्याचा गैरफायदा घेत आहे," असा आरोप गावडे यांनी केला.

अंतिम इशारा

"कोकणात १ लाख ८० हजार हेक्टर आंबा-काजू लागवड आहे. सरकारने याच अधिवेशनात नुकसान रकमेची तरतूद करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा शेतकरी-बागायतदार गप्प बसणार नाहीत. जलसमाधी बरोबरच अधिवेशनात घुसून याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही," असा सज्जड इशारा संजय गावडे यांनी दिला आहे.

NDRF निकषही अन्यायकारक  

केंद्राच्या NDRF निकषानुसार कोरडवाहू फळबागांसाठी ८५०० हेक्टर तर सुधारित दर १८ हजार ते २२ हजार ५०० हेक्टर आहे. मात्र बहुवार्षिक पिकांसाठी हे दर अत्यंत तोकडे असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.