LIVE UPDATES

समाजसेवेचा सन्मान

साई श्रद्धा दिव्यांग, निराधार, गरजू संघटनेचा पुरस्कार सोहळा उत्साहात
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 27, 2026 13:00 PM
views 20  views

दोडामार्ग : एखादा कार्यक्रम आयोजित करणे सोपे असते, मात्र त्या कार्यक्रमासाठी लागणारा आर्थिक खर्च उभा करणे आणि सातत्याने समाजासाठी काम करणे हे मोठे आव्हान असते. स्वतःची आर्थिक परिस्थिती मर्यादित असतानाही दिव्यांग, निराधार आणि गरजू बांधवांसाठी कायम धावून जाणारे साबाजी सावंत हे खऱ्या अर्थाने समाजसेवक आहेत. त्यांच्या कार्याला राजाश्रय मिळण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी केले.



दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथील समाजसेवा हायस्कूलच्या सभामंडपात साई श्रद्धा दिव्यांग, निराधार, गरजू संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी नाडकर्णी बोलत होते.

यावेळी बोलताना एकनाथ नाडकर्णी म्हणाले, "आजच्या कार्यक्रमाकडे अनेक लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली ही दुर्दैवी बाब आहे. समाजातील प्रत्येक घटकाने अशा संस्थांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे," असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या साई श्रद्धा संघटनेच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावंत यांनी कार्यक्रमाचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध आणि प्रभावी पद्धतीने केले होते.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पी. पी. देसाई, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, आयुष हॉस्पिटल धारगळचे डॉ. विनायक चाकोर, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, कोलझरचे सरपंच सुजल गवस, तळकटचे सरपंच सुरेंद्र सावंत, सामाजिक कार्यकर्ते विकास कुलकर्णी, सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण गवस, कोलझर देवस्थान समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. दिव्यांग, निराधार आणि अनाथ बांधवांसाठी सातत्याने मदतीचा हात देणारे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच दोडामार्ग येथे सेवेत असताना दिव्यांग व गरजू रुग्णांना सहकार्य करणारे डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे आणि शिक्षण व समाजकार्यात योगदान देणारे माजी मुख्याध्यापक तथा कोलझर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष पी. पी. देसाई यांचाही गौरव करण्यात आला.

यावेळी डॉ. विनायक चाकोर यांनी आयुष हॉस्पिटल धारगळच्या माध्यमातून दिव्यांग, गरजू आणि निराधार नागरिकांसाठी विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती दिली. आगामी काळात आरोग्य क्षेत्रात आणखी काही नवीन सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

साई श्रद्धा संघटनेच्या माध्यमातून सामाजिक, पत्रकारिता, दिव्यांग कल्याण आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग, निराधार, गरजू बांधव तसेच नागरिक उपस्थित होते.

उपस्थितांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजातील सेवाभावाची भावना अधिक मजबूत होत असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अध्यक्ष साबाजी सावंत यांनी सर्व मान्यवर, कार्यकर्ते, देणगीदार आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. दिव्यांग, निराधार आणि गरजू बांधवांसाठी संघटनेचे कार्य भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.