LIVE UPDATES

डिजिटल युगात पतसंस्था सक्षम करण्याचा मंत्र

सिंधुदुर्गात एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 25, 2026 20:49 PM
views 12  views

सिंधुदुर्ग : नुकतेच महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ पुणे व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नागरी,ग्रामिण बिगरशेती व पगारदार पतसंस्थांच्या पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी एकदिवशीय प्रशिक्षण शिबीर सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न झाले. प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनिल राऊळ, एमसीडीसीचे विभागीय समन्वयक अरुण काकडे, सनदी लेखापाल कोल्हापूर सुनिल नागावकर, पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष जॉय डॉन्टस, उपाध्यक्ष नंदकिशोर कोरगावकर, सुनील नाईक, संचालक अॅड. समीर वंजारी, सुभाष चौधरी, विष्णु पराडकर, तज्ञ संचालक रमेश बोंद्रे, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.कविटकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व पतसंस्था फेडरेशनचे व्यवस्थापक महेश्वर कुंभार आदी उपस्थित होते.

सहकारी पतसंस्था तळागाळातील लोकांची आर्थिक गरज पूर्ण करण्याचे काम करत आहे. हि पतसंस्था चळवळ अधिकाधिक सक्षम करण्यासाठी शासनाने पतसंस्थांसाठी विविध निकष लागु केले आहेत. जेणेकरून पतसंस्था अधिकाधिक सक्षम बनून सर्वसामान्यांना चांगली सेवा देऊ शकतात. यासाठी शासनाच्या धोरणांप्रमाणे तसेच बदलत्या कायद्याप्रमाणे पतसंस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्यावत ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. मागील दहा वर्षापूर्वीचे पतसंस्था धोरण आणि आताच्या धोरणाबाबत खूपच फरक आहे. यासाठी पतसंस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी प्रशिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केले. पतसंस्थांचा विकास साधायचा असेल तर आपल्या संस्थेमध्ये डिजिटल प्रणाली वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे युवक वर्ग सुद्धा पतसंस्थांकडे आकर्षित होणार आहे. त्याचप्रमाणे पतसंस्थेचा कारभारातील पारदर्शकपणा ग्राहकांपर्यंत पोहचणार आहे. या स्पर्धेच्या युगात आपण योग्य प्रमाणे कर्जवितरण करणे आवश्यक आहे. कारण आज कर्जवसुली हि आपणासमोर मोठी समस्या आहे. आणि वसुलीवर आपल्या संस्थेचा डोलारा उभा असतो. यासाठी कर्ज वितरण करताना योग्य पद्धतीने करणे गरजेचे असल्याचे मत श्री. दळवी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी विकास महामंडळाच्या माध्यमातून पतसंस्थांसाठी वेगवेगळ्या विषयांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येतात. पतसंस्थांमधील पदाधिकारी व व्यवस्थापक यांना पतसंस्थेबाबत आत्मीयता असणे गरजेचे आहे. आपल्या पतसंस्थेचा विकास, प्रगती हेच ध्येय असणे आवश्यक आहे तरच पतसंस्थेचा विकास तसेच व्यवहारात पारदर्शकता  राहणार असल्याचे मत एमसीडीसी पुणे चे समन्वयक अरुण काकडे यांनी व्यक्त केलं. देशात मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर सहकार चळवळीसमोर अनेक आव्हाने उभी राहिली. परंतु या सर्व आव्हानांना तोंड देत पतसंस्था चळवळ सक्षमपणे उभी आहे. आज शासनस्तरावरून  पतसंस्थांना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच यापुढेही आणखी बदल अपेक्षित आहेत. या सर्वांचा  पतसंस्थांनी स्वीकार करणे आवश्यक असल्याचे मत सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनिल राऊळ यांनी मांडले. होणाऱ्या बदलांबाबत योग्य ते मार्गदर्शन पतसंस्था फेडरेशन तर्फे करण्यात येणार आहे. आपण फेडरेशनच्या माध्यमातून एकसंघपणे येणाऱ्या आव्हानांना तोंड देऊन जिल्ह्यातील पतसंस्था चळवळ अधिक सक्षम व विकसित करणार असल्याचे मत श्री.राऊळ यांनी सांगितले.

पतसंस्थांसमोर इनकम टॅक्सबाबत महत्वाची समस्या असून त्याबाबत सविस्तर व कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी सनदी लेखापाल, कोल्हापूर सुनिल नागावकर यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. पतसंस्थांनी आर्थिक पत्रके बनवताना आयकर कायद्यातील कोणत्या तरतुदी विचारात घेणे आवश्यक आहे. तसेच पतसंस्थांनी आयकर आकारणी आणि आयकर कपाती याबाबत तरतुदी याबाबत पतसंस्थांना सखोल मार्गदर्शन श्री.नागावकर यांनी केले. यावेळी अनेक पतसंस्थांनी आपल्या समस्या/प्रश्न मांडले व त्यास श्री. नागावकर यांनी चांगल्या प्रकारे उत्तरे दिलीत. यावेळी पतसंस्थांच्या कारभारात पारदर्शकता, सुसूत्रपणा असणे आवश्यक आहे. तसेच संचालकांनी सहकाराबाबत प्रशिक्षित होणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा उपनिबंधक डॉ.सोपान शिंदे यांनी मांडले. पतसंस्थांच्या कार्यप्रणालीबाबत महत्वपूर्ण माहिती दिली. यावेळी व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन वाळके, विद्यासेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, वैभवशाली श्री देव रामेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सांबारी, स्नेह नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक श्री उसगावकर, प.पु.भालचंद्र महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.ब्रम्ह्दंडे, तसेच जिल्ह्यातील अनेक पतसंस्थांचे पदाधिकारी,  व्यवस्थापक तसेच कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन पतसंस्था फेडरेशनचे व्यवस्थापक महेश्वर कुंभार यांनी केले.