
सिंधुदुर्गनगरी : कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत आणि मानव साधन विकास संस्था संचलित जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्गच्यावतीने संस्थेच्या प्रशिक्षकांसाठी आज 'एकदिवसीय क्षमता बांधणी कार्यशाळे'चे आयोजन करण्यात आले. आजचा दिवस संस्थेसाठी दुहेरी महत्त्वाचा ठरला. एकीकडे जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष सुरेश प्रभू यांचा वाढदिवस असून दुसरीकडे संस्थेच्या यशस्वी वाटचालीची २५ वर्षे म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष पूर्ण होत आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये संस्थेचे संचालक सुधीर पालव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ते म्हणाले, "संपूर्ण देशातील जन शिक्षण संस्थान चे जनक तसेच जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष सुरेश प्रभू यांच्यामुळेच केंद्र सरकार युवक-युवतींना कौशल्य प्रदान करण्याचे उद्दिष्ट साध्य करू शकत आहे. गेल्या २५ वर्षांत संस्थेने ग्रामीण भागातील युवक, युवती आणि महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करणे हे आमचे ध्येय आहे."या कार्यशाळेचा मुख्य उद्देश बदलत्या काळानुसार प्रशिक्षकांना नवीन तंत्रज्ञान, आधुनिक अध्यापन पद्धती आणि प्रशिक्षणातील गुणवत्ता कशी वाढवता येईल हे शिकवणे हा होता. कोणतेही कौशल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यात प्रशिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी सांगण्यात आले.अध्यक्षीय भाषण
कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन होडावडेकर म्हणाले, "या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रशिक्षकांना अधिक सक्षम बनवणे आणि नवनवीन माहिती प्रशिक्षणाद्वारे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम करणे हाच आमचा उद्देश आहे." डॉ. शरद सावंत - मानव साधन विकास संस्थेचे वरिष्ठ विश्वस्थ व संस्थेचे माजी अध्यक्ष यांची सर्वाना मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला डॉ. शरद सावंत - मानव साधन विकास संस्थेचे वरिष्ठ विश्वस्थ व संस्थेचे माजी अध्यक्ष, जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्गच्या संचालिका अनुराधा दीक्षित, नितीन बांबर्डेकर - मार्गदर्शक, प्रगती चव्हाण तसेच संस्थेचे सर्व प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रमेश खरात यांनी केले तर आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गणेश परब यांनी मानले.











