LIVE UPDATES

Omkar elephant viral video : ओंकार हत्तीच्या डोक्याला जखम !

पेटती मशाल अंगावर फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल : हल्ला कुणाच्या आदेशाने ? वनविभागाला हत्तीला मारून टाकायचय : गुणेश गवस
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 30, 2026 16:00 PM
views 102  views
Omkar elephant torch Attack

सावंतवाडी : ओंकार हत्तीच्या अंगावर धगधगती मशाल फेकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून हा प्रकार झाल्याचे बोलले जातय. व्हिडिओत देखील संबंधिताचा ड्रेसकोड तसाच दिसत आहे. मात्र, उपवनसंरक्षकांकडून संबंधित व्यक्ती वन कर्मचारी की खासगी हे व्हिडिओत स्पष्ट दिसत नसल्याचा दावा करत कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिलीय.

तसेच मशाल फेकण्याचे कोणत्याही प्रकारचे आदेश आपल्याकडून दिले नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, मागच्या सात दिवसांपासून ओंकारच्या डोक्यावर एक जखम दिसत असून ती नेमकी कशामुळे झाली ? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच वनविभागाला हत्तीला मारून टाकायचय असा गंभीर आरोप गुणेश गवस यांनी केला असून घडलेल्या प्रकाराबाबत समाज माध्यमात तीव्र संताप व्यक्त होतोय. 

वन्यजीव आणि माणसांमधील संघर्षा दरम्यान हत्तीला नियंत्रणात आणण्यासाठी हे कृत्य झाल्याची चर्चा आहे. मात्र, ज्या प्रकारे हल्ला केला गेला ती बाब निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भर वस्तीतून वनविभागाच्या इशाऱ्यावर शांततेत जाणाऱ्या ओंकारवर पेटती मशाल फेकण्याची वेळ का आली ? हा देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात हल्ला करणाऱ्याचा ड्रेसकोड वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसारखा दिसत आहे.

तसेच सोबत आणखीन काहीजणही दिसूनही येत आहेत. त्यामुळे प्राणीप्रेमी आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वन्य हत्तींना मारण्यास, जखमी करण्यास सक्त मनाई आहे. प्राण्यांना अनावश्यक त्रास देणे, मारहाण करणे, छळ करणे किंवा त्यांना वेदना होईल अशा कोणत्याही कृती करणे गुन्हा आहे. मात्र, असं असताना मशाल हल्ला का केला ? कुणाच्या आदेशाने केला असे सवाल उपस्थित होत आहेत. 

वन्यप्रेमींचा संताप !

दरम्यान, शेतीभातातून हुसकावून लावण्यासाठी वनविभागाच्याच काही कर्मचाऱ्यांनी हत्तीच्या अंगावर पेटत्या मशाली फेकल्यात. अशाच प्रकारे सुतळी बॉम्ब देखील फेकले होते. ही कृती अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे.

शेतकऱ्याचं नुकसान होतय. पण, हुसकावून लावण्यासाठी अशा प्रकारच्या विघातक कृती करणं हे सुद्धा कायद्याने गुन्हा आहे. सुतळी बॉम्बचा टाकल्यानंतर देखील वनविभागाने माफी मागितली होती. तसं कृत्य भविष्यात होणार नाही असं सांगितलं. परंतू, वनविभागाने परत एकदा तेच कृत्य केलं. या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वन्यप्रेमी तुषार देसाई यांनी केली आहे.

वनविभागाला ओंकार हत्तीला संपवायचय : गुणेश गवस

वनविभागाकडून 'ओंकार हत्तीवरती पेटत्या मशाली, बॉम्ब फेकले जात आहेत. त्याच्या अंगावरती आणि डोक्यावरती यामुळे दुखापत झाली आहे. त्याचे पुरावे आमच्याजवळ आहेत. बांदा पंचक्रोशीमध्ये दुसऱ्यांदा हत्ती  आलेला आहे.

गेल्या वर्षीही हीच परिस्थिती होती. वनविभाग त्याला हुसकावून लावण्यासाठी हे प्रकार करत असून त्याला मारून टाकायच आहे. ओंकारला संपवायचय असून १४ वर्षापूर्वी माणगावमध्ये परिस्थिती झाली, तीच परिस्थिती आता या वनविभागाला करायची आहे असा  जोरदार आरोप ओंकार फाउंडेशनचे अध्यक्ष गुणेश गवस यांनी केलाय.

मशाल फेकण्याचे कोणतेही आदेश नाही : उपवनसंरक्षक

याबाबत उपवनसंरक्षकांना विचारणा केली असता ते म्हणाले, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हत्तीवर मशाल फेकणारी व्यक्ती वन कर्मचारी आहे की खाजगी व्यक्ती ? हे स्पष्ट दिसत नाही. वन्य प्राण्यांवर अशा प्रकारे मशाल फेकण्याचे कोणतेही आदेश वन विभागाकडून दिलेले नाहीत. या घटनेत कोण सहभागी आहे याचा शोध घेऊन दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी दिली.

एकंदरीतच, हल्ला कोणी केला ? कशासाठी केला ? हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ओंकार हत्तीसोबत वनविभागाची टीम सतत कार्यरत असते. वनरक्षक, वनमजूर, रॅपीट रेस्क्यू टीमचे सदस्य त्याच्या मागेपुढे असतात. अशा ६ टीम वेगवेगळ्या भागात कार्यान्वित आहेत.

त्यामुळे ज्यावेळी मशाल फेकण्याचा प्रकार घडला तेव्हा वनविभागाच्या टीमने त्याला का रोखलं नाही ? आठवडाभरापूर्वी घडलेल्या प्रकाराबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना का नाही ? हत्ती पोसायचा असं ठरल्यानंतर वनविभागाकडून त्याचा फुटबॉल कशासाठी केला जातोय ? गोव्यात जाण्यापासून त्याला रोखलं का जात नाही ? आदी सवाल उपस्थित होत आहेत.

त्यातच ओंकारच्या डोक्याला झालेली जखम बघता वनविभागाच्या भूमिकेवरही संशय निर्माण होत असून झालेल्या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होत आहे. 

नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत!

यंदा पाऊस न झाल्याने सिंधुदुर्गात देखील दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. स्थानिक शेतकरी अडचणीत असून भात, नाचणी आदी शेती पूर्णपणे अडचणीत आहे. पिक करपू लागली असून वाढ खुंटली आहे. त्यात ओंकार हत्ती भातशेतीसह नारळ सुपारीच्या बागेत फिरून नुकसान करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पडणाऱ्या पिकांचही नुकसान होत आहे.

नुकसानभरपाई हवी तशी मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे‌. याबाबत उपवनसंरक्षकांना प्रश्न केला असता नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून प्रकरणे मंजुरीसाठी पाठवली जात आहेत.

काही प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रे वेळेत न मिळाल्यामुळे भरपाई मिळण्यास उशीर होतो. मात्र, ज्यांचे प्रस्ताव पूर्ण आहेत, त्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई दिली जाईल अशी माहिती उपवनसंरक्षकांनी दिली आहे.