...न.प. व सा.बा. अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करा : गुरुदास गवंडे

Edited by: विनायक गांवस
Published on: June 11, 2024 11:51 AM
views 13  views

सावंतवाडी : शहरात व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यावर महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने पाईपलाईन टाकलेली आहे. ही  पाईपलाईन टाकताना नगरपरिषदेने व सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंपनीला काही सूचना देऊन काम करण्यास सांगितले होते. लोकांकडून वारंवार या संदर्भात तक्रारी होत होत्या. यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेत पावसाळ्यापूर्वी साईडपट्टी व्यवस्थित करा असं सांगितलं होत‌. मात्र, भराव व्यवस्थित न घातल्यामुळे, निकृष्ट पद्धतीने साईडपट्टी केल्यामुळे पहिल्या पावसातच मोठमोठे खड्डे पडून सावंतवाडी शिरोडा महामार्गावर व बांदा महामार्गावर साईडपट्टी मोठ्या प्रमाणात खचली आहे.

त्यामुळे भविष्यात साईड पट्टीने वाहतूक करताना वाहन अपघात वा कोणतीही जीवीत हानी होण्याची शक्यता आहे. अशी घटना घडल्यास संबंधित दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हे दाखल करावा लागेल असा इशारा मनसेच्या  गुरुदास गवंडे यांनी दिला आहे. गॅस कंपनीने संबंधित दोन्ही विभागाकडे आगाऊ रक्कम भरली असताना सावंतवाडी नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने मलमपट्टी लावून साईडपट्टी बुजवलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना वाहन चालकांना त्रास देण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व सावंतवाडी नगरपरिषद करत आहेत. दोन दिवसात संबंधित भरावातील खड्डे  तात्काळ न बुजवल्यास वाहन चालकांना घेऊन स्वतः नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारू असा इशाराही गुरुदास गवंडे यांनी दिला आहे.