
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून कणकवली तालुक्यात सर्वाधिक १८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर रात्रीही पावसाचा जोर कायम राहिला. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळून घरे, गोठे व शेडचे मोठे नुकसान झाले असून काही गावांतील विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे.कासार्डे येथील साटमवाडीमध्ये संतोष सीताराम पडळकर यांच्या घराच्या शेडवर झाड पडल्याने नुकसान झाले. मौजे फोंडाघाट कोरगावकरवाडी येथे प्रमोद रघुनाथ तोरसकर यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये झाडे व विद्युत तारा पडल्याने काही गावातील वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.सतत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच वीजवाहिन्या व धोकादायक झाडांपासून दूर राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.










