
वैभववाडी : “केवळ दिखाऊपणासाठी काम करून चालणार नाही. आरोग्य विभाग हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून या विभागातील प्रत्येकाने गांभीर्याने काम केले पाहिजे. कोणाचाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही आणि तालुक्याच्या आरोग्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा सज्जड इशारा पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी दिला.
येथील पंचायत समिती सभागृहात ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसभापती साची कोलते, सदस्य देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, साधना नकाशे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवन राऊत, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. समीर पोटे आदी उपस्थित होते.
बैठकीत अभियानाचा गावनिहाय आढावा घेत सभापती रावराणे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची तपासणी केली. “या अभियानाअंतर्गत आपला तालुका सरस ठरवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून नियोजनबद्ध पद्धतीने काम केले पाहिजे. पुढील पाच वर्षांत विविध अभियानांमधून तालुक्याला बक्षिसे मिळवायची आहेत,” असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, तालुक्यातील आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांचा मुद्दा बैठकीत चर्चेत आला. यावरून सभापती रावराणे यांनी आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक आनंदा चव्हाण यांना धारेवर धरले. “गेल्या चार वर्षांपासून प्रशासनाच्या हाती सत्ता असताना ही रिक्त पदे का भरली गेली नाहीत? दरमहा जिल्हास्तरावर होणाऱ्या आढावा बैठका केवळ खर्चाच्या बिलांसाठीच घेतल्या जातात का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.तालुक्यातील आरोग्य सेविकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.










