LIVE UPDATES

आंबा-काजू बागायतदारांचा एल्गार

मोठ्या आंदोलनाची तयारी ; सौंदाळेतून शेतकरी संवाद अभियानाला प्रारंभ
Edited by: स्वप्नील लोके
Published on: May 26, 2026 16:35 PM
views 9  views

  •  न्यायासाठी निर्णायक लढ्याचा इशारा

देवगड : आंबा व काजू बागायतदारांच्या न्याय हक्कासाठी आता मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली असून येणारे आंदोलन इतिहास घडवणारे ठरेल, असा इशारा आंबा व काजू बागायतदार संघाचे अध्यक्ष आनंद उर्फ काका ढोके यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सौंदाळे येथून सुरुवात करण्यात आली असून शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

सौंदाळे येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी बैठकीत मोठ्या संख्येने आंबा व काजू उत्पादक सहभागी झाले होते. यावेळी गणेश गांवकर, किरण टेंबुलकर, अजय तेली आदी उपस्थित होते. आंबा व काजू बागायतदारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा उभारणाऱ्या संघटनेचा शेतकऱ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावर्षी आंबा पिकावर आलेल्या अस्मानी संकटामुळे तालुक्यातील आंबा उत्पादनाला मोठा फटका बसला. अवकाळी वातावरण, बदलते हवामान आणि नैसर्गिक संकटांमुळे तब्बल ८० ते ८५ टक्के उत्पादन घटल्याचा दावा बागायतदारांनी केला आहे. परिणामी आंबा बागायतदारांसह व्यापाऱ्यांवरही मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.


या पार्श्वभूमीवर आंबा बागायतदारांनी शासनाकडे हेक्टरी पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी मेळावे, मोर्चे, रास्ता रोको आंदोलन तसेच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला. मात्र शासनाकडून तुटपुंजी मदत जाहीर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला.


सत्ताधारी पक्ष या आंदोलनाला राजकीय वळण देऊन शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. मात्र आंबा व काजू बागायतदार आणि व्यापारी आता गप्प बसणार नसून आपल्या न्याय हक्कासाठी शेवटपर्यंत संघर्ष करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


यासाठी आता तालुकाभर गावोगावी बैठका घेऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेत मोठे आंदोलन उभारण्यात येणार आहे. त्यानुसार रविवारी सौंदाळे येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. आगामी काळात प्रत्येक गावात बैठका घेऊन व्यापक जनजागृती आणि संघटनबांधणी करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.