
देवगड : देवगड तालुक्यातील पडेल येथील गुरुवार दिनांक २८ मे २०२६ रोजी भरणारा साप्ताहिक आठवडा बाजार यावेळेस बंद ठेवण्यात येणार आहे. रस्ता बांधकाम आणि वाहतुकीच्या समस्येमुळे ग्रामस्थांची व व्यापाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पडेल परिसरात सध्या नवीन रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आठवडा बाजारासाठी येणाऱ्या दुकानदारांना दुकाने मांडण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. तसेच, बाजाराच्या दिवशी ग्राहक आणि व्यापाऱ्यांच्या वाहनांमुळे होणारी पार्किंगची समस्या आणि त्यामुळे उद्भवणारी तीव्र वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रशासकीय खबरदारी म्हणून या आठवड्याचा बाजार भरवला जाणार नाही, असे ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सरपंचांचे आवाहन
"रस्त्याच्या कामामुळे व्यापारी आणि ग्राहक दोघांचीही गैरसोय होऊ नये, तसेच वाहतूक व्यवस्था कोलमडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तरी पडेल ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील सर्व नागरिक, ग्राहक आणि व्यापारी बांधवांनी याची नोंद घ्यावी व ग्रामपंचायतीला सहकार्य करावे," असे आवाहन पडेल ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी केले आहे.










