
बांदा : बांदा येथे ‘कृषी कोकण भाजीपाला व फळ विक्री केंद्रा’च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक अभिनव व आशादायी उपक्रम सुरू करण्यात येत आहे. शेतकरी हिताचा विचार करून बाळू उर्फ नारायण गावडे (झोळंबे), विजय नाईक (कुंब्रल), परशुराम करमळकर (बांदा) आणि सिद्धेश गवस (कोनशी) व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही संकल्पना पुढे आणली आहे.
या विक्री केंद्रामध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी पिकविलेला ताजा भाजीपाला, फळे, कडधान्ये, विविध प्रकारचा तांदूळ, सुरणासारखी कंदमुळे, खोबरेल तेल, आंब्याचे आगळ, फणसाचे गरे (भाजीसाठी व पिकलेले) अशा विविध उत्पादनांची खरेदी करून ती वाजवी दरात ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांसाठी होम डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे स्थानिक ग्राहकांना ताज्या शेतमालाचा थेट लाभ मिळणार असून शेतकऱ्यांनाही त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळणार आहे.
या माध्यमातून बांदा परिसरातील तसेच दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना एक विश्वासार्ह खरेदीदार मिळणार असून पुढील काळात हा उपक्रम मुंबई, पुणे, ठाणे, गोवा तसेच देशभर विस्तारण्याचा मानस आहे. उपक्रम यशस्वी झाल्यास दोडामार्ग तालुक्यासह इतर ठिकाणीही अशा प्रकारचे स्टॉल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाकडून नारायण गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून सर्व नागरिकांनी या उपक्रमाला उपस्थित राहून पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या घामाला योग्य भाव मिळवून देणारा हा उपक्रम निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा ठरणार आहे.
गुडीपाढव्याच्या मुहूर्तावर ‘कृषी कोकण’ विक्री केंद्राचा होणार शुभारंभ
बांदा येथे सुरू होत असलेल्या ‘कृषी कोकण भाजीपाला व फळ विक्री केंद्रा’च्या उद्घाटन गुरवारी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार आहे. उदघाटन सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांच्या हस्ते होणार असून जिल्हा भाजपा महिला अध्यक्षा सौ. श्वेता कोरगांवकर आणि दोडामार्ग शेतकरी बागायतदार संघाचे अध्यक्ष संजय देसाई हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
तसेच या कार्यक्रमाला बांदा सरपंच प्रियंका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगळावे आणि कृषी अधिकारी युवराज भुर्डे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.











