
सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कणकवली येथील प्राणी जन्म नियंत्रण (ABC) केंद्राला सोमवार (दि. १६ मार्च) रोजी भेट देऊन केंद्राच्या कामकाजाची सखोल पाहणी केली. यावेळी केंद्रातील नोंदी, स्वच्छता व्यवस्था, कुत्र्यांच्या देखभालीसाठी उपलब्ध सुविधा तसेच शस्त्रक्रिया प्रक्रियेचा त्यांनी आढावा घेतला.
पाहणीदरम्यान काही त्रुटी निदर्शनास आल्याने संबंधित यंत्रणेला कामकाज अधिक शिस्तबद्ध व नियमांनुसार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या SUO MOTO WRIT PETITION (Civil) No(s). 5 of 2025 आणि प्राणी जन्म नियंत्रण (Animal Birth Control) नियम, २०२३ यानुसार सर्व प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
या भेटीत उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, नगर पालिका प्रशासन सह आयुक्त विनायक औंधकर, कणकवलीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, पशुसंवर्धन विभागाचे श्री. बिलोलीकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
केंद्राच्या कामकाजासाठी आवश्यक समितीची स्थापना झाली आहे का, तसेच त्यात प्राणीप्रेमींचा समावेश आहे का याची खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आले. पकडलेल्या कुत्र्यांना त्याच परिसरात सोडल्याची GPS फोटोसह नोंद ठेवणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
प्रत्येक कुत्र्याचा स्वतंत्र केस पेपर ठेवणे, आहाराची नियमित नोंद करणे आणि अनावश्यक विलंब न लावता प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना मूळ ठिकाणी सोडण्यावर विशेष भर देण्यात आला. शस्त्रक्रियेपूर्वी आवश्यक काळ उपाशी ठेवणे तसेच शस्त्रक्रियेदरम्यान काढलेले अवयव फॉर्मालिनमध्ये सुरक्षित ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
याशिवाय आहारासाठी लागणाऱ्या साहित्याचा स्टॉक रजिस्टर, तसेच भेट देणाऱ्यांची नोंद व्हिजिट रजिस्टरमध्ये ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र परिसर स्वच्छ, हवेशीर व नीटनेटका ठेवण्याचे निर्देश देतानाच सर्व कुत्र्यांना सुरक्षित पिंजऱ्यात ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. गरोदर किंवा जखमी कुत्री पकडू नयेत, तसेच सर्व कुत्र्यांचे लसीकरण व टॅगिंग करणे बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पाळीव कुत्र्यांच्या मालकांनीही आपल्या प्राण्यांचे वेळोवेळी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.










