
कणकवली : एकच नारा ...नारायण राणे...या टॅग लाईनखाली जिल्ह्यात सर्वत्र लागलेले बॅनर...राणे समर्थकांचे लागलेले व्हाट्स अँप स्टेट्स... अन् काही तासातच हजारो राणे समर्थकांच्या गाड्यांचा ताफा सिंधुदुर्ग गोवा सीमेवर रवाना झाला. नारायण राणे आगे बढो...हम तुम्हारे साथ है, राणे साहेब अंगार है...बाकी सब भंगार है...अशा गगनभेदी घोषणा देत नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक निकालानंतर प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार नारायण राणे यांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत यावेळी करण्यात आले. गोवा ते सिंधुदुर्ग सिमेपासून हजारो गाड्यांचा ताफा कणकवलीला रवाना झाला. रॅलीचे कणकवलीत जाहीर सभेत रूपांतर झाले. मला संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु त्यांना पुरून उरलो. जोपर्यंत रामेश्वराची कृपा आहे तोपर्यंत माझं कोणीही वाकडं करू शकणार नाही असा इशाराच नारायण राणे यांनी दिला.
कुठच्याही प्रकारे कोणतीही अधिकृत माहिती नाही, कोणी प्रसिद्धीपत्रक काढले नाही, कुठच्या पदाधिकाऱ्याने कसलेही जाहीर आवाहन केले नाही. फक्त एकच बॅनर लागला तो म्हणजे एकच नारा...नारायण राणे...या एका बॅनरवर हजारोंच्या संख्येने राणे समर्थक एकवटले होते. बांद्यापासून कणकवली पर्यंत रॅली निघाली. आणि भव्य रॅली नंतर कणकवलीत जाहीर सभा झाली. या सभेत राणे समर्थक आणि राणे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यासह अन्य कुठच्याच पदाधिकाऱ्यांचे भाषण न होता थेट खासदार नारायण राणे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. यावेळी व्यासपठीवर सौ. नीलम नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना उपनेते संजय आग्रे, संजू परब, यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार नारायण राणे म्हणाले, हा मेळावा आयोजित करण्याची वेळ का आणि कोणामुळे आली ? भाजपा हा माझा शेवटचा पक्ष असल्याचे वरिष्ठाना आधीच सांगितले होते. मी स्वाभिमानाने जगणारा माणूस आहे. कधीही पदाचा मोह नाही, आणि पदाचा कधी दुरुपयोग केला नाही. विरोधकही हेच सांगतील. राणेंना संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु राणे त्या सर्वांना पुरून उरले. रामेश्वराची कृपा असे पर्यंत मला संपवण शक्य नाही. कार्यकर्ता म्हणून डगमगायचं नाही. मी समर्थ आहे. वय कितीही होऊदे मी काम करतच राहणार. कार्यकर्त्यांच्या प्रेमाने भारावून गेलो. आता जसे निवडणुकीत वाटले जाते तसे मी कधीच वाटले नाही. कार्यकर्त्यांना पैसं दिले तरी कार्यकर्ते पैसे घेत नव्हते. पैसे देऊन आपलंस करणे यांचे कार्य काय ? पैसेच द्यायचे असतील तर प्रचार का करायचा ? मात्र या निमित्ताने कार्यकर्त्यांना कोटी कळायला लागले. राणेंच्या विरोधात बोलण्यासाठीही पैसे दिले जातात. ज्यांना पैसे हवे तर घ्या आणि बिनधास्त जा असे राणेंनी ठणकावून सांगितले. आजपर्यंत मी असले प्रकार केले नाहीत म्हणून 1990 पासून कार्यकर्ते आजही आपल्यासोबत आहेत. पक्ष मजबूत करणे हेच महत्वाचे. आजपर्यंत केलेल्या प्रवासात मला कोणाचीही मदत नाही. उलट माझ्या विरोधात कट कारस्थानेच करण्यात आली. आता आराम करायचे दिवस आले. दोघेही मुलगे आता जिल्ह्यात चांगले काम करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटले की दोन्ही मुलांचे कौतुक करतात. निलेश राणे विधानसभेत अभ्यासू भाषण करत आहेत. नितेश राणे मंत्री म्हणून राज्यात छाप पाडली आहे. आमचा दुष्मन कोणी नाही. पैशाच्या लालसेसाठी काहीजण सोडून गेले. मात्र ते सुखी नाहीत. असले पैसे पचत नाहीत. मेहनतीने मिळवलेले पैसे उपयोगाला येतील. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कोणीही मतभेद करण्याचा प्रयत्न करू नका. पक्ष मजबूत होईल असे काम करा. भाजपा अनेक वर्षे टिकेल असं काम करा. महाराष्ट्र सुजलाम, सुफलाम होईल असे काम करा असे आवाहन राणे यांनी केले.











