
सावंतवाडी : नव्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित २०व्या ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ या आंतर राज्यस्तरीय गायन स्पर्धेच्या पहिल्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात दिमाखात संपन्न झाले. या चुरशीच्या स्पर्धेतून तीन विजेत्यांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
सावंतवाडीत झालेल्या या पहिल्या फेरीत एकूण ११ स्पर्धकांनी आपला कलाविष्कार सादर केला. यात हर्षल सगुण मेस्त्री, सानिका संजय गावडे, वरदा भाग्यविधाता वारंग, पवन पवार, आशीर्वाद अजय रेडकर, अद्वैत संतोष पालव, आत्माराम भिकाजी कावठणकर आणि अन्वी मुकुंद धारगळकर यांचा समावेश होता. या सर्वांमधून आपल्या गायकीने परीक्षकांची मने जिंकत हर्ष संजय नकाशे, दिलीप संजय देसाई आणि पल्लवी संजय पिळणकर या तिघांनी विजेतेपद पटकावत पुढील फेरी गाठली आहे. या कार्यक्रमाला सम्राट क्लब इंटरनॅशनलचे (राज्य-१) अध्यक्ष शशिकांत पुनाजी, सचिव विनोद मळीक, खजिनदार सुबोध रामनाथकर, सम्राट क्लब मयेचे अध्यक्ष नरेश पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच स्टेट वनचे अध्यक्ष पांडुरंग दादा, निखिल साळगांवकर, स्वप्ना मातोंडकर, विवेकानंद नार्वेकर, मंगेश गांवकर, कालिदास कोळेकर परीक्षक सौ. आमोणकर व इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सम्राट संगीत सितारा २०२६ च्या एकूण चार प्राथमिक फेऱ्या होणार आहेत. यातील पुढील फेरी ७ जून २०२६ रोजी बेळगाव येथे पार पडेल. उर्वरित दोन फेऱ्या उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा येथे आयोजित केल्या जाणार आहेत. उपांत्य फेरी १४ जून २०२६ रोजी गोवा कला अकादमीच्या 'ब्लॅक बॉक्स' (पणजी) येथे तर अंतिम फेरी २१ जून २०२६ रोजी दीनानाथ मंगेशकर कला अकादमी, पणजी येथे रंगणार आहे.











