
सावंतवाडी : खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर केसरी येथे कृषी विभागाच्यावतीने 'खरीप हंगाम मोहीम २०२६' अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 'एल निनो' जागरूकता शिवार फेरी, जीवामृत निर्मिती प्रात्यक्षिक, संवाद सेतू आणि बीजप्रक्रिया या विषयांवर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी विजय गंबरे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना 'एल निनो' मुळे हवामानावर होणारे संभाव्य परिणाम आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम यावर भाष्य केले. बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, तसेच नैसर्गिक शेतीचे महत्त्व आणि तिची कार्यपद्धती याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. उप कृषी अधिकारी श्री. व्हि. के. पाटील यांनी खरीप पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे किती आवश्यक आहे हे पटवून दिले. सहाय्यक कृषी अधिकारी टी. सी. राणे यांनी कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. या उपक्रमांतर्गत शिवार फेरी काढून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमाला केसरी परिसरातील ५२ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक शेतकरी आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी राबवण्यात आलेल्या या मोहिमेचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे.










