
कुडाळ : पावसाळ्यात संपर्क तुटण्याच्या समस्येमुळे गेली १० वर्षे वनवास भोगणाऱ्या निवजे-आंबेरी ग्रामस्थांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेल्या या भव्य पुलाचे लोकार्पण त्यांच्याच हस्ते उत्साहात पार पडले. "आमदार नसतानाही मला या पुलाची गरज माहित होती, आज हे काम पूर्ण झाल्याचा मला सार्थ अभिमान आहे," अशा भावना आमदार राणे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
पावसाळ्यातील भीती कायमची मिटली - निवजे-आंबेरी येथील जुना पूल अत्यंत छोटा असल्याने पावसाळ्यात पाणी वाढले की या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटायचा. ग्रामस्थांकडून मागील १० वर्षांपासून नवीन पुलाची मागणी होत होती, मात्र तांत्रिक अडचणी आणि निधीअभावी हे काम रखडले होते. आ. निलेश राणे यांनी या प्रश्नी पाठपुरावा केल्यामुळे हा पूल आता वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे.
यावेळी बोलताना आ. निलेश राणे यांनी जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींना कडक शब्दांत सुनावले. ते म्हणाले, "मला कोणाकडूनही कामात चालढकल नको आहे. मला कारणं सांगू नका, मला 'रिझल्ट' हवा आहे. गावाच्या विकासासाठी तुमची दृष्टी स्पष्ट हवी. तक्रारी करण्यापेक्षा विकासकामांसाठी कुठे काय हवे, हे मला सांगा."
"तुम्ही मला निवडून दिले आहे, आता कामाची जबाबदारी माझी आहे. निवजे-आंबेरीवासीयांनी आपला आशीर्वाद असाच पाठीशी ठेवावा," असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पुलाचे लोकार्पण झाल्यामुळे ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.










