LIVE UPDATES

नगरपरिषदेकडून अनधिकृत गाड्यांवर कारवाई

प्रशासनाकडून कारवाईत पक्षपात ?
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 07, 2026 16:58 PM
views 84  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून पालिकेच्या हद्दीत अनधिकृतपणे लावलेल्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम अधिक कडक करण्यात आली असून गाडे, टपऱ्या काढयासंदर्भात दोन-तीन वेळा सूचना केली होती. मात्र, दखल न घेतल्याने कारवाई करण्यात आल्याचे प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी सांगितले. 

आज दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. एसपीके कॉलेज समोरील भागातील रस्त्यावर लागलेले अनधिकृत गाडे हटविण्यात आले. याबाबत विचारलं असता मुख्याधिकारी म्हणाले,  सावंतवाडी नगरपरिषदेच्यावतीने शहरामध्ये विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या लागलेले गाडे, टपऱ्या ज्यांची कोणाचीही परवानगी नाही त्या टपऱ्या हटवण्यासंदर्भातली अतिक्रमण हटाव मोहीम नगरपालिकेनं गणपती काळापासून सुरू केली आहे. 

त्याचाच हा दुसरा टप्पा आहे. यामध्ये नगरपालिकेच्या विविध विभागाचे १२ ते १३ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. नगरपालिकेच्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्तांच्या हद्दींमध्ये असलेल्या टपऱ्या, गाडे, रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या टपऱ्या-गाडे काढण्याची मोहीम आम्ही सुरू केली आहे. यासाठी आपण सुरुवातीला त्यांना गाडे, टपऱ्या काढून घेण्यासंदर्भात दोन-तीन वेळा सूचना केली होती. त्याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यामुळे नगरपालिका याबाबत कारवाई करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, रामेश्वर प्लाझा येथील कारवाई बारगळली असून पक्षपाती पणाने प्रशासन वागत असल्याबाबत नागरिकांत असलेल्या चर्चांबाबत विचारल असता मुख्याधिकारी म्हणाले, रामेश्वर प्लाझाच्याबाबत नोटीस इश्यू केलेल्या नाहीत. कारण, ते पार्किंगमध्ये आहेत. पार्किंगमध्ये जर काढायचं म्हटलं तर ते खासगी गाडेधारक आहेत. ज्यांनी पोटभाडे करून ठेवलेले त्यांना आपण जाऊन जागेवर सूचना केली होती. 

पार्किंगचे बोर्ड्स ज्यावेळेस आपण लावणार आहोत पार्किंग क्षेत्रामध्ये त्यावेळेस तिथं असणाऱ्या लोकांवर कारवाई करणारच आहोत. पण, आतासुद्धा जर पार्किंगमध्ये असतील त्यांच्यावर सुद्धा नेक्स्ट टप्प्यात कारवाई होणार आहे अशी माहिती दिली. तसेच ज्या दुकानदारांनी दुकानाबाहेर अतिक्रमण केले आहे त्या संबंधितांना नोटीस इश्यू केली जाईल. जर काढलं गेलं नाही तर निश्चितच कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्याधिकारी यांनी दिली.