
मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने ‘ऑपरेशन गोल्डन नेक्सस’ अंतर्गत मोठी कारवाई करत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सोने तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त करत भाजप पदाधिकाऱ्यासह ७ जणांना अटक केली आहे. मुंबई विमानतळ कर्मचारी असलेला अजित आचरेकर हा भाजप कामगार संघटनेचा चिटणीस आहे. तो अन्य कामगारांच्या मदतीने सोने तस्करीत सहभागी असल्याची माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धजन्य परिस्थिती सोनं खरेदी न करण्याचे आवाहन केलेल असताना सोने तस्करीत भाजप पदाधिकारी सापडल्याने चर्चांना उत आला आहे.
या कारवाईत सुमारे ५ कोटी रुपये किमतीचे ३.२ किलो सोने जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बँकॉकहून मुंबईमार्गे प्रवास करणाऱ्या बांगलादेशी आणि श्रीलंकेच्या नागरिकांकडून तस्करीचे सोने स्वीकारून ते विमानतळाबाहेर पोहोचविण्यात काही विमानतळ कर्मचारी सहभागी असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. ६ जून रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळाजवळील परिसरात डीआरआय अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. त्याच दरम्यान विमानतळ कर्मचारी असलेला आचरेकर, रोहित सिंह, संतोष पोळ तेथे आले. सिंहने सोन्याची डिलिव्हरी दिली. आचरेकर आणि संतोष पोळ सोन्याची डिलिव्हरी सुरळीत होण्यासाठी पहारा देत होते. समीउल्लाह शाह या हस्तकाने सोन्याची डिलिव्हरी स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले. तर ताब्यात घेतलेल्या चालक अमरीश कांबळेचा प्राथमिक चौकशीत या प्रकरणात थेट सहभाग आढळला नाही. त्यानंतरच्या तपासात एका बांगलादेशी व दोन श्रीलंकन नागरिकांची ओळख पटली. या तिघांनी शरीरात सोने लपवून भारतात आणल्याचे उघड झाले. पुढील प्रवासासाठी निघण्याच्या तयारीत असताना कारवाई करण्यात आली.
या कारवाईत २४ कॅरेट सोन्याची भुकटी मेणाच्या स्वरूपात लपवून आणलेले एकूण ३.२ किलो सोने जप्त करण्यात आले. सीमाशुल्क कायदा, १९६२ अंतर्गत हे सोने जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात तीन परदेशी प्रवासी, तीन विमानतळ कर्मचारी आणि एका स्थानिक स्वीकारकर्त्यासह ७ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईवरून उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समाज माध्यमांवर एक छायाचित्र प्रसिद्ध करत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबई विमानतळावरील कामगार संघटनांमध्ये हस्तक्षेप करून काही व्यक्तींना संरक्षण देण्यात आले. आता त्याच लोकांना सोने तस्करी प्रकरणात डीआरआयने अटक केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास भाजपला निधी कुठून मिळतो ? हे उघड होईल, असा दावा करत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.










