
सचिन देसाई यांची माहिती
वेंगुर्ला : शिवसेनेचे कुडाळ- मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांचे विविध प्रश्न व व्यथा विधानभवनात अधिवेशनात मांडल्या. याची तात्काळ दखल घेत महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दशावतारी कलाकरांच्या अनुदानात दुप्पट वाढ केली. तर इतर मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आमदार निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या मागण्यांवर लक्ष वेधल्यानंतर त्या मान्य झाल्या याबद्दल वेंगुर्ला तालुका शिवसेना व सर्व दशावतारी कलाकार यांच्यावतीने आमदार निलेश राणे यांची वेळ घेऊन लवकरच जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे वेंगुर्ला पंचायत समिती उपसभापती तथा शिवसेनेचे प्रभारी वेंगुर्ला तालुकाप्रमुख सचिन देसाई यांनी सांगितले आहे.
विधानसभेत लक्षवेधी चर्चेत कोकणची लोककला असणाऱ्या दशावतार व दशावतारी कालावंतांची व्यथा, प्रलंबित मागण्या यावर आमदार निलेश राणे सभागृहात आक्रमक होत आवाज उठवला. तसेच दशावतारी कलाकारांना ओळ्खपत्रांचा प्रश्न बरीच वर्षे प्रलंबित आहे. राज्यस्तरीय एकही पुरस्कार दशावतारी कलाकाराला मिळाला नाही. याबाबत सुद्धा त्यांनी आवाज उठवत या मागण्यांवर लक्ष देण्याची मागणी केली. यावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दशावतारी कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ करण्याची घोषणा केली. तसेच इतर मागण्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे आश्वासन दिले.
याबद्दल वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने पं स उपसभापती सचिन देसाई यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच लवकरच आमदार निलेश राणे यांचा जाहीर सत्कार वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.











