केवळ उत्तरं नको ; कामांचा 'टाइम बॉंड' निकाल लावावा

आ. निलेश राणेंनी भरला आमसभेत सज्जड दम
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: April 28, 2026 18:01 PM
views 69  views

जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले

मालवण : तब्बल नऊ वर्षांनंतर मालवण तालुक्याची आमसभा आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही आणि तितक्याच आक्रमक वातावरणात पार पडली. यापुढे आमसभा दरवर्षी होणार असून, प्रशासनाने केवळ उत्तरे न देता कामांचा 'टाइम बॉंड' निकाल लावावा," असा सज्जड दम आमदार राणे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. यावेळी त्यांनी विविध विभागांचा सविस्तर आढावा घेत जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले.

मालवण नगरपरिषद मामा वरेरकर नाट्यगृहात आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा झाली. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल, सभापती प्रज्ञा चव्हाण, वित्त, बांधकाम सभापती संतोष साटविलकर, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, उपसभापती घनश्याम झाड, तहसीलदार गणेश लव्हे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, जिल्हा परिषद सदस्य दिपलक्ष्मी पडते, सुमेधा पाताडे, अक्षता गावडे, वर्षा सांबारी, यांच्यासह अन्य जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. आमसभा घेतल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचा यावेळी अभिनंदन ठराव घेण्यात आला. आमदार झाल्यानंतर तळशील, देवबाग, दांडी, येथील बंधाऱ्यांसाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी कोट्यावधी निधी आणल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचा अभिनंदन ठराव घेण्यात आला. 

२०१७ नंतर आज २०२६ मध्ये ही सभा होत असल्याचा संदर्भ देत आमदार राणे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून कुडाळ-मालवण मतदारसंघ विकासाच्या बाबतीत दुर्लक्षित राहिला होता. मंत्रालयातून निधी मिळवण्यासाठी या मतदारसंघाची साधी नोंदही नव्हती. मात्र, गेल्या वर्षभरात पाठपुरावा करून आपण हक्काचा निधी खेचून आणला आहे. आता हा निधी लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. जे अधिकारी काम करणार नाहीत किंवा सभेला अनुपस्थित राहतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या.

तालुक्यातील खराब रस्त्यांबाबत चौके सरपंचांसह अनेक ग्रामस्थांनी तक्रारींचा पाढा वाचला. भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याच्या कामांमुळे जलजीवनची पाईपलाईन फुटणे आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजित पाटील यांनी १० मे पर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. "पोट-कंत्राटदारांच्या भरवशावर कामे सोडू नका, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, मग तो कोणत्याही पक्षाचा असो," असे आदेश आमदार श्री. राणेंनी दिले.

महावितरण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात ४५० कोटींचे बजेट मंजूर असून लवकरच ११ उपकेंद्रे कार्यान्वित होतील. आचरा आणि पेंडूर ते कुंभारमाठ दरम्यान सुरू असलेली भूमिगत वीज वाहिन्यांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. स्मार्ट मीटरबाबत ही सरकारची पॉलिसी असून ग्राहकांना सरासरी बिले दिली जाणार नाहीत, याची स्पष्टता यावेळी करण्यात आली.

समुद्रकिनारपट्टीवर होणाऱ्या अवैध मलपी बोटींच्या घुसखोरीबाबत आमदार राणे अत्यंत आक्रमक झाले. "मच्छिमार नौका पकडल्या तर केवळ दंड न करता त्या फोडण्याची कार्यवाही करा. कोणाचीही हिंमत होता कामा नये. मत्स्य विभागावर मॅनेजमेंटचा कलंक लागता कामा नये," असे त्यांनी मत्स्यव्यवसाय विभागाला ठणकावले.

हेदूळ येथे नवीन रुग्णालय उभारणे आणि ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुरसंचारच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून काम करण्याऐवजी जमिनीवर उतरून टॉवर्सचे प्रलंबित प्रश्न सोडवा, अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा इशारा बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना दिला.

जलपर्यटनाचे सर्व अधिकार स्थानिक विभागाकडे असावेत, या मागणीसाठी मुंबईत वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याचे आश्वासन आमदारांनी दिले. सेवानिवृत्त होत असलेले अधिकारी श्याम चव्हाण यांच्या कामाचे कौतुक करून त्यांच्या अनुभवाचा फायदा जिल्ह्याला घेता येईल, असे राणे म्हणाले.

मी जनतेमध्ये जाणारा आणि ग्राऊंडवर काम करणारा कार्यकर्ता आहे. मला लोकांना उत्तरं द्यावी लागतात, त्यामुळे तुम्हीही मला उत्तरदायी आहात हे विसरू नका," अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाला कर्तव्यपूर्तीची जाणीव करून दिली.