
दोडामार्ग : येथील ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचे पुन्हा एकदा चित्र समोर आले आहे. रुग्णालयातील एक्स-रे मशीन व सोनोग्राफी सेवा नियमित नाही. तसेच पाण्याचा आर.ओ. प्लांट बंद अवस्थेत असून रुग्णांना शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. या खेरीज अनेक भीषण समस्या समोर आल्या आहेत. या समस्या तात्काळ मार्गी लावून रुग्णांना दर्जेदार सेवा द्याव्यात, अशी मागणी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या जनता आरोग्य दरबाराच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयाला मंगळवारी दिलेल्या प्रत्यक्ष भेटीत हे भयाण वास्तव समोर आले. रुग्णालयातील असे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी या तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृह, नगरपरिषद बुधवारी २९ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीचे पदाधिकारी नंदन वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
ही समिती रुग्णालयांना भेट देऊन तेथील रुग्णांच्या व नातेवाईकांच्या समस्या जाणून घेत आहे. याखेरीज वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देखील कोणकोणत्या सेवा दिल्या जातात याबद्दल पदाधिकारी माहिती घेत आहेत. अशीच माहिती घेण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. येथील रुग्णांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. रुग्णालयातील एक्स-रे मशीन व सोनोग्राफी सेवा नियमित नाही. डायलिसिस सेंटर मध्ये वैद्यकीय सेवा अपुरी आहे. दंत चिकित्सालयात आवश्यक साहित्यांचा पूर्ण अभाव आहे. पिण्याच्या पाण्याचा आरओ प्लांट बंद अवस्थेत आहे.
रुग्णालयाच्या छत गळतीमुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. अपुऱ्या कर्मचारी वर्ग असे अनेक समस्या या समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या. त्यांनी वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेऊन तात्काळ त्यांच्यापुढे या समस्यांचा पाढा वाचला. तसेच तात्काळ या समस्या मार्गी लावून रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याची मागणी त्यांनी केली. विशेषतः सोनोग्राफी मशीन, डायलेसिस सेंटर व्यवस्थित सुरू ठेवावे अशी आग्रही मागणी केली. जर रुग्णांना सेवा देण्यास आरोग्य विभाग अपयशी ठरत असेल तर या विरोधात जनतेचा उद्रेक अनिवार्य असल्याचा इशारा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी कृती समितीचे नंदन वेंगुर्लेकर, सुभाष गोवेकर, संजय लाड, उदय पास्ते, स्क्रूज फर्नांडिस, समीर शिंदे, डॉ. अतुल पांढरे, भूषण सावंत, संदीप गवस, बाळा उर्फ कृष्णा धाऊसकर, सागर शिरसाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.












