
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, सर्व तांत्रिक अडचणी दूर होऊन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत सिटीझन चार्टर प्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकाला शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामिण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, आपला दवाखाना, जिल्हा परिषद दवाखाना या सर्व शासकिय आरोग्य यंत्रणेत तातडीने सुधारणा होऊन स्थानिकांचे प्राण वाचावेत या प्रमुख हेतुने जिल्हास्तरीय जनता आरोग्य दरबाराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन एन. बी. रेडकर यांनी केले आहे. या जनता दरबार प्रसंगी आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी उपस्थित राहणार असून मंत्रालयात बैठक असल्याने ३० एप्रिल रोजी पालकमंत्री नितेश राणे सावंतवाडीत येऊन कृती समितीसह बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
उपजिल्हा रुग्णालय कृती समिती, सावंतवाडी, अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय जनता आरोग्य दरबाराच आयोजन उद्या करण्यात आले आहे. न.प.च्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सकाळी १० ते १ या वेळेत आयोजन करण्यात आले असून प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्गातील पिडीत, वंचित व त्रासित जनतेने मोठ्या संख्येने आपल्या लेखी तक्रारी व आवश्यक पुराव्यासह उपस्थित राहाव असे आवाहन श्री. रेडकर यांनी केले.
या उपक्रमाच्या सुक्ष्म नियोजनासाठी तालुकानिहाय प्रतिनिधींची अस्थायी संयोजन समितीच्या सुचनेनुसार नियुक्ती करण्यात आलेली आहे. सिंधुदुर्गातील कोणत्याही नागरीकाला आरोग्य यंत्रणा कायमस्वरुपी सक्षम होण्यासाठी ज्या काही सूचना, समस्या, अडचणी, उपाय किंवा शंका त्यांच्याकडे मांडता येतील. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आपला दवाखाना आदी सर्व सेवांमध्ये सुधारणा व्हावी हा प्रमुख हेतू आहे. आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी यात सहभागी व्हावे असे आवाहन नंदन वेंगुर्लेकर यांनी केले. यावेळी सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय कृती समितीचे एन.बी.रेडकर, प्रा.सुभाष गोवेकर, अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गचे राजू केळुसकर, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रुपा मुद्राळे, क्रूझ फर्नांडिस,लक्ष्मण कदम, संपत दळवी, ॲड. तेजस परब आदी उपस्थित होते.












