
कणकवली : कलमठ जि. प. शाळा नंबर १ पासून दीडशे मीटरवर असलेल्या एका इमारतीधील व्यावसायिक गाळ्यांमध्ये बीअर बार सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. या बारला विरोध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील नाडकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील विठ्ठल मंदिरात सोमवारी सायंकाळी बैठक पार पडली. यात सरपंच यांनी विशेष ग्रामसभा लावावी. त्या बैठकीत ग्रामस्थांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी देण्याचे ठरले.
बैठकीस ज्येष्ठ नागरिक अनंत पारकर, नंदकुमार हजारे, अनंत हजारे, तनोज कळसुलकर, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, प्रसाद कांबळी, दिलीप फसणगावकर, राजन हजारे, अशोक लाड, संजय कडुलकर, सुशांत राऊळ, शशिकांत कांबळी, नितीन पेडणेकर, मंथन हजारे, रोहित हजारे, हर्ष हजारे, बाबू पांगम, वैशाली हजारे, अनिता साळगावकर, सीमा कडुलकर, मंगल हजारे, प्रणाली धुमाळे, श्रद्धा हजारे, देवता कांबळी, प्रेरणा हजारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी सुनील नाडकर्णी यांनी बारला कायदेशीर मार्गाने विरोध करता येईल, याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. विनायक मेस्त्री यांनी बारबंदीविरोधात वार्ड सभा लावण्यात आली आहे. ग्रामस्थांचा बारविरोध असेल तर त्या ठिकाणी बार सुरू होता कामा नये, अशी भूमिका मांडली. सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये म्हणून कलमठ बाजारपेठमध्ये बार सुरू करू नये, अशी भूमिका घेतली. बैठकीत सरपंच यांनी विशेष ग्रामसभा लावावी. त्या बैठकीत ग्रामस्थांची चर्चा करून निर्णय घ्यावा, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी देण्याचे ठरले. दरम्यान, बारची मापे घेण्यासाठी आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची ग्रामस्थांनी भेट घेत बारला परवनागी देऊ नये, अशी मागणी केली होती.












