डेगवे ते तांबोळी फॉरेस्ट रस्ता अखेर मार्गी

आ. दीपक केसरकरांच्या उपस्थितीत भूमिपूजन
Edited by: लवू परब
Published on: April 28, 2026 19:55 PM
views 16  views

सावंतवाडी : डेगवे ते तांबोळी दरम्यानचा फॉरेस्ट रस्ता अखेर मार्गी लागला असून या रस्त्याचे भूमिपूजन माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. वनखात्याच्या परवानगीअभावी हा रस्ता अनेक वर्षे प्रलंबित होता. मात्र, पाठपुराव्यानंतर अखेर या कामाला मंजुरी मिळाली. 


आमदार निधीतून १५ लाख रुपयांची तरतूद करून या कामाला गती दिली आहे. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे, याचे समाधान वाटत असल्याची भावना आम. केसरकर यांनी व्यक्त केली. अनेक दशकांपासून ग्रामस्थांची असलेली ही मागणी पूर्ण होत असल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. सुमारे ३०० मीटर लांबीचा हा रस्ता डेगवे, तांबोळी, असनिये, घारपी, भालावल आदी दहा गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या रस्त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ होणार असून शेती, शिक्षण व दैनंदिन व्यवहारासाठी मोठी मदत मिळणार आहे. माझ्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन झाले.  या प्रसंगी जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, पं. स. सभापती सुस्मिता जाधव, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, पं. स. सदस्य महेश धुरी, प्रियांका देसाई, बांदा मंडल प्रभारी अध्यक्ष मधुकर देसाई, सरपंच वेदिका नाईक, राजन देसाई, उपसरपंच मंगेश देसाई, जगदीश सावंत, ग्रा.पं. सदस्य राजेश देसाई, प्रगती देसाई, रूपाली देसाई, माजी सरपंच मंगलदास देसाई, माजी सभापती भगवानराव देसाई, सोसायटी चेअरमन प्रवीण देसाई, तांबोळी माजी सरपंच अभिलाष देसाई, राजेश विरनोडकर, वाफोली उपसरपंच विनेश गवस, सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ संचालक राजन रेडकर, तसेच डेगवे, तांबोळी, असनिये, घारपी, भालावल येथील ग्रामस्थ उपस्थित होते.