LIVE UPDATES

दोडामार्ग पोलिसांच्या तत्परतेने बेपत्ता भावंड मिळाली सुखरूप

अवघ्या काही तासात शोधमोहीम यशस्वी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 09, 2026 10:30 AM
views 198  views

दोडामार्ग : सासोली-हेदुस येथून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन भावांचा दोडामार्ग पोलिसांनी तत्परतेने भेडशी येथे सुखरूप शोध लावला. पोलिसांच्या जलद प्रतिसादामुळे संभाव्य अनर्थ टळला असून, त्यांच्या कार्यक्षमतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.सासोली-हेदुस येथील शुभम सतीश राठोड (११) आणि सत्यम सतीश राठोड (९) हे दोघे भाऊ सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास घरातून दुकानात खाद्यपदार्थ आणण्यासाठी जात असल्याचे सांगून बाहेर पडले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. नातेवाईकांनी परिसरात तसेच विविध ठिकाणी शोध घेतला, मात्र दोघांचाही मागमूस लागला नाही.

रात्री उशिरा ११.३० वाजता मुलांचे मामा राजू चव्हाण व मामी सौ. तनुजा चव्हाण हे बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी दोडामार्ग पोलिस ठाण्यात दाखल झाले. यावेळी पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, आपत्कालीन सेवा ११२ वरून भेडशी परिसरात दोन लहान मुले फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिस कॉन्स्टेबल परशुराम गावडे आणि अजित जाधव यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांना सुखरूप ताब्यात घेतले.यानंतर मुलांना दोडामार्ग पोलिस ठाण्यात आणून आवश्यक खातरजमा करण्यात आली आणि नंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मुलांना सुखरूप पाहताच कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी पोलिस ठाण्यात भेट देऊन मुलांचा तातडीने शोध घेण्याची मागणी केली होती. तसेच हेदुस येथील ग्रामस्थ अभिजित धाऊसकर व वीज ग्राहक संघटनेचे सचिव भूषण सावंत हेही पोलिस ठाण्यात उपस्थित होते.दोडामार्ग पोलिसांनी दाखविलेली तत्परता, समन्वय आणि संवेदनशीलतेमुळे दोन निष्पाप चिमुरडे सुखरूप घरी परतले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस प्रशासनावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, मुलांच्या नातेवाईकांनी दोडामार्ग पोलिसांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.