LIVE UPDATES

पतसंस्था समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम : मनीष दळवी

जिल्हास्तरीय पतसंस्था अधिवेशन २०२६ मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन
Edited by: विनायक गांवस
Published on: May 23, 2026 21:19 PM
views 28  views

सावंतवाडी : पतसंस्था हे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. मात्र, गुणात्मकदृष्ट्या आपल्या कोकणातील सहकार क्षेत्र खूप मोठे आहे. आजच्या डिजिटल बँकिंगच्या युगात जर पतसंस्थांची गुणवत्ता टिकवून ठेवायची असेल, तर कर्मचाऱ्यांना आणि संचालकांनाही प्रशिक्षण देणे अनिवार्य आहे. पतसंस्थांमध्ये ठेव ठेवणाऱ्या ठेवीदारांचा आणि कर्ज घेणाऱ्या कर्जदारांचा पतसंस्थांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप मोठा आहे. त्यामुळे पतसंस्थेची प्रगती करताना तिचा पाया मजबूत असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले.

     सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली येथे सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित आणि जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'जिल्हास्तरीय पतसंस्था अधिवेशन २०२६' च्या मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भूतकाळातील योगदानाचा उल्लेख करत श्री. दळवी म्हणाले की, पी. एफ. डॉन्ट्स यांनी लावलेलं सहकाराचं रोपटं आता खूप मोठे झाले आहे. सुनील राऊळ यांनी या रोपट्याची अतिशय उत्तम प्रकारे जपणूक केली असून त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज सहकार क्षेत्राचा विस्तार वाढला आहे. या फेडरेशनच्या माध्यमातून आपण सर्वांनी मिळून एकत्र येत दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन त्यांनी केले. तसेच भविष्यात अशा अधिवेशनांना जिल्हा बँकेचे सदैव सहकार्य राहील, अशी ग्वाही देत दळवी यांनी 'मोठ्या भावाच्या भूमिकेतून' जिल्हा बँकेच्या वतीने या अधिवेशनासाठी १ लाख रुपयांची मदत जाहीर केली. यापुढेही जिल्हा बँकेकडून विनामोबदला सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

  सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारचे अधिवेशन प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. सहकाराच्या माध्यमातून सर्वांची सेवा करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. या शिबिरात विविध विषयांचे ज्ञान संपादन करणे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे आहे. सहकार चळवळ अशीच पुढे सुरू ठेवायची असेल, तर संस्थांनी 'आदर्श उपविधी' स्वीकारणे गरजेचे आहे. सध्या पतसंस्थांना कर्ज वसुलीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि आगामी काळातील 'एआय' (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर या संदर्भातही या अधिवेशनात मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच, या चळवळीत अहोरात्र काम करून सर्वसामान्यांची सेवा करणाऱ्या आणि उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांचा या अधिवेशनात विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकण विभागाचे अध्यक्ष गिरीश तुळपुले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बदल आणि उपविधी हाच सहकाराचा मुख्य पाया आहे. आज महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांकडे जवळजवळ ९५ हजार कोटी रुपयांचा एवढा मोठा निधी उपलब्ध आहे. ऐतिहासिक संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, सन १८०० मध्ये पहिली पतसंस्था कवठेकर यांनी स्थापन केली होती, ज्याचे भागभांडवल अवघे सव्वा दोन रुपये होते. आपल्या भाषणात त्यांनी 'पिग्मी कमिशन' संदर्भातील विविध मुद्द्यांवरही प्रकाश टाकला. याप्रसंगी सुदर्शन भालेराव, शांतीलाल शिंगणे आणि श्री. लांबर यांनीही आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात सहकाराचा ध्वज फडकवून आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी सहकार क्षेत्रावर आधारित एक सुंदर गीत सादर करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार संचालक जॉय डान्टस् यांनी मानले. या अधिवेशनाच्या व्यासपीठावर जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, आंबोलीच्या सरपंच सावित्री पालेकर, महाराष्ट्र फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगणे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुदर्शन भालेराव, कोकण विभागाचे अध्यक्ष गिरीश तुळपुले, जिल्हा निबंधक सोपान शिंदे, सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ, मायकल डिसोजा, शशिकांत गावडे, गुरुनाथ पेडणेकर, महेश कुंभार, जॉय डान्टस्, बाबुराव कविटकर, रमेश बोंद्रे, नंदकिशोर कोरगावकर, सुनील नाईक, समीर वंजारी, विष्णू पराडकर, सुभाष चौधरी, पांडुरंग काकतकर, शिक्षक लांबर, बी. आर. यादव, आणि राजन तेली आदी मान्यवर उपस्थित होते.