
मालवण : गावागावातील विकास सहकारी संस्था या सहकारचा पाया आहे. हा पायाला अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेमार्फत आम्ही अनेक पावले उचलली आहेत. वसुलपात्र कर्जाची शंभर टक्के परतफेड करणाऱ्या संस्था कौतुकास पात्र आहेत. त्यांचा आदर्श घेत इतर संस्थानीही काम करावे. सहकारच्या माध्यमातून एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीसाठी काम करूया, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी येथे बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे प्राथमिक विकास संस्था मार्गदर्शन आणि सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संचालक व्हिक्टर डांटस, बाबा परब, मेघनाद धुरी, रवींद्र मडगावकर, मुख्यकार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, क्षेत्र वसुली सरव्यवस्थापक दत्ताराम गावडे, संस्था संगणकीकरण नोडल अधिकारी वसंत हड़कर, बँकेचे मालवणचे विकास अधिकारी पूर्णनंद सरमळकर, स्वप्नील सुबोध केळूसकर व गिरीश आळवे, मालवण शाखाव्यवस्थापक दीपक चव्हाण आदी व इतर उपस्थित होते. विकास अधिकारी पूर्णनंद सरमळकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी ३० जून २०२६ अखेर बँक पातळीवरील वसुलपात्र कर्जाची शंभर टक्के परतफेड करून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विरण ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. विरण, श्रावण विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. श्रावण, श्री सातेरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. काळसे, पेंडूर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या.पेंडूर, श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. चिंदर, त्रिंबक ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. त्रिंबक, वायंगणी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. वायंगणी, बांदिवडे ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. बांदिवडे, श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. आचरा, असरोंडी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. असरोंडी या संस्थांच्या संचालक मंडळाचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी मार्गदर्शन करतानाच उपस्थित असलेल्या तालुक्यातील विविध विकास सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थांना भेडसावणाऱ्या विविध समस्या जाणून घेतल्या. यामध्ये खावटी कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी प्रामुख्याने करण्यात आली. यावर बोलताना अध्यक्ष मनीष दळवी यांनी जिल्हाभरातील विकास संस्थांशी चर्चा करून, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊन खावटी कर्जमाफी बाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच बिगरशेती कर्ज विकास संस्थांच्या माध्यमातून घेण्यासाठीची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने व अधिक सुलभ करण्यात येईल, असेही दळवी यांनी सांगितले. यावेळी व्हिक्टर डांटस यांनीही मार्गदर्शन करत विकास संस्था या मिनी बँक असून संस्थांच्या संचालकांनी संस्था प्रगतीसाठी अधिकाधिक प्रयत्न करावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन पूर्णानंद सरमळकर यांनी केले. या कार्यक्रमास मालवण तालुक्यातील विविध विकास सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, सदस्य, जिल्हा बँक कर्मचारी आदी उपस्थित होते.











