LIVE UPDATES

IIT (BHU) वाराणसीमध्ये एम. फार्म.साठी श्रावणी कुबलची निवड

श्री रेकोबा विद्यालयाचा गौरव
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 02, 2026 19:08 PM
views 58  views

मालवण : तालुक्यातील वायरी-भूतनाथ येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. श्रावणी प्रवीण कुबल हिची देशातील प्रतिष्ठित IIT (BHU), वाराणसी येथे Master of Pharmacy (M.Pharm.) – Pharmaceutical Chemistry या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. श्रावणीने दहावीपर्यंतचे शिक्षण श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर तिने शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, रत्नागिरी येथून बी. फार्म. (B.Pharm.) पदवी प्रथम श्रेणी विशेष प्राविण्यासह संपादन केली. औषधनिर्मिती क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याचा ध्यास घेत तिने सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर हे यश मिळविले. IIT (BHU), वाराणसी येथे एम. फार्म. अभ्यासक्रमासाठी देशभरातील अत्यंत गुणवंत आणि मर्यादित विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यामुळे श्रावणीची निवड ही विशेष गौरवास्पद मानली जात आहे.

Pharmaceutical Chemistry ही औषधांचे संशोधन, नवीन औषधांचा शोध, औषधांची गुणवत्ता व सुरक्षितता, औषधनिर्मिती, जैवतंत्रज्ञान, संशोधन प्रयोगशाळा तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय औषध उद्योगात करिअरच्या व्यापक संधी उपलब्ध करून देणारी महत्त्वाची शाखा आहे. आरोग्य आणि संशोधन क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत असल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणीही सातत्याने वाढत आहे.

श्रावणीच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या विविध संधी उपलब्ध असल्याचा सकारात्मक संदेश गेला असून, योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यश मिळविता येते, हे तिच्या यशातून अधोरेखित झाले आहे. श्रावणी कुबल हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष, व्यवस्थापन मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.