
मालवण : जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुकळवाड पंचायत समिती मतदार संघाचे भाजपा महायुतीचे संतोष दत्तात्रय गावडे हे उच्चशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीच्या माध्यमातून त्यांचा गावागावात प्रचार सुरु असून मतदारांचा वाढता पाठींबा लक्षात घेता त्यांच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून भाजपा जेष्ठ नेते खासदार नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आणि भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली लढवल्या जात आहेत. निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती मिळून भाजपा शिवसेना महायुतीचे 25 सदस्य बिनविरोध विजयी झाले. ही विजयाची नांदी ठरली असून जनतेचा कौल विकासाच्या दृष्टीने महायुतीच्याच उमेदवारांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट होत आहे.
मालवण तालुक्यातही महायुतीच्या उमेदवारांचा प्रभाव सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. सुकळवाड पंचायत समिती मतदार संघातून भाजपा महायुतीचे संतोष गावडे तसेच सुकळवाड जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेना महायुतीच्या सुमेधा पाताडे निवडणूक रिंगणात आहेत. गावागावात घरोघर प्रचार यंत्रणा राबवून मतदारांच्या भेटी घेतल्या जात आहेत. विकासकामांसाठी महायुतीच गरजेची असून महायुतीच्या उमेदवारांना जनतेतूनही पाठिंबा मिळत आहे. जनतेतून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता सुकळवाड पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार संतोष गावडे व जिल्हा परिषद उमेदवार सुमेधा पाताडे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.











