गोवेरी - म्हारसेवाडी परिसरात गवारेड्यांचा वावर

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 04, 2026 17:51 PM
views 47  views

कुडाळ :  कुडाळ तालुक्यातील गोवेरी-म्हारसेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गवारेड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बुधवारी सकाळी या परिसरात चक्क सात-आठ गवारेड्यांचा कळप मुक्तपणे संचार करताना आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. वनविभागाने या गवारेड्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. बुधवारी सकाळी गोवेरी येथील ग्रामस्थ प्रथमेश तेंडोलकर यांना सात-आठ गवारेड्यांचा एक मोठा कळप निदर्शनास आला. हा कळप लोकवस्तीच्या जवळ आणि शेतजमिनीत बिनधास्तपणे वावरत असल्याचे पाहून त्यांनी इतर ग्रामस्थांना याबाबत कल्पना दिली. या जंगली प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता

सध्या या भागात शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उन्हाळी पिकांची लागवड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मिरची, शेंगदाणा, कुळीथ, भाजीपाला यांसारख्या पिकांचा समावेश आहे. गवारेड्यांचा हा कळप शेतात शिरल्यास या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. आधीच नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत असताना आता या जंगली प्राण्यांच्या संकटामुळे त्यांच्या तोंडचा घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यापूर्वीही या परिसरात जंगली प्राण्यांचा वावर होता, मात्र आता कळपाने गवारेडे येत असल्याने धोका वाढला आहे. "गवारेड्यांचा हा कळप कधीही कोणावर हल्ला करू शकतो किंवा शेती उध्वस्त करू शकतो. त्यामुळे वनविभागाने याची गंभीर दखल घेऊन या प्राण्यांना मानवी वस्तीपासून दूर हाकलण्यासाठी उपाययोजना कराव्यात," अशी मागणी गोवेरी-म्हारसेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.