
दोडामार्ग : मणेरी पं. स. निवडणूक रणांगणात एक अनुभवी, अभ्यासू आणि जमिनीवर काम करणारा उमेदवार उतरला आहे. पाटये पुनर्वसन गावचे थेट लोकनियुक्त सरपंच प्रवीण गवस यांनी मणेरी पंचायत समिती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे, आणि त्यामुळे संपूर्ण मतदारसंघातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. गावाच्या विकासाची धुरा थेट खांद्यावर घेऊन काम करणारे प्रवीण गवस हे केवळ प्रशासनाच्या प्रत्येक पातळीचा सखोल अनुभव असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. सरपंचपदाच्या काळात त्यांनी पुनर्वसन गावातील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून आपली स्वतंत्र छाप उमटवली आहे.
प्रशासन कसे चालते, निर्णय कुठे अडतात आणि ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणत्या मार्गाने दबाव टाकावा लागतो, याची त्यांना अचूक जाण आहे. त्यामुळेच ‘केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष काम’ हा त्यांचा मंत्र मतदारांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. राजकीय पक्षांच्या झेंड्याखालील उमेदवारांपेक्षा स्वतंत्र विचार, निर्भीड भूमिका म्हणून प्रवीण गवस यांच्याकडे पाहिले जात आहे. अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी जनतेसमोर मांडलेली भूमिका ही कोणत्याही राजकीय दबावाशिवाय विकास साधण्याची असल्याने, विविध घटकांतून त्यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे.










