मळगाव रेल्वे फाटकाचा वाहनधारकांना मनस्ताप

Edited by: विनायक गांवस
Published on: April 22, 2026 16:42 PM
views 236  views

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सावंतवाडी-शिरोडा या महत्त्वाच्या राज्यमार्गावर हे फाटक असल्याने दररोज प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जात असून येथे तातडीने उड्डाणपूल उभारण्याची मागणी जोर धरत आहे.


रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार, गाडी येण्यापूर्वी आणि गेल्यानंतर साधारणतः १०-१५ मिनिटे हे फाटक बंद ठेवले जाते. या मार्गावरून गोव्याला जाणाऱ्या गाड्यांची ये-जा मोठी असल्याने दिवसातून अनेकवेळा हे फाटक बंद असते. परिणामी, फाटकाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला या विलंबाचा मोठा फटका बसत आहे. या फाटकाला रेल्वे स्थानकामार्फत एक पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. मात्र, हा रस्ता रेल्वे स्थानकाला सुमारे २ किलोमीटरचा वळसा घालून जातो. वाढते इंधन दर आणि अतिरिक्त अंतरामुळे वाहनधारक या वळसा मार्गापेक्षा फाटकावर थांबणे पसंत करतात. मात्र, यामुळे त्यांचा वेळ वाया जात आहे. वाहनधारकांच्या मते सावंतवाडी-शिरोडा हा मार्ग पर्यटन आणि व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. फाटकामुळे होणारी ही कोंडी सोडवण्यासाठी येथे उड्डाणपूल बांधणे हाच एकमेव ठोस उपाय आहे. रेल्वे प्रशासनाने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन समन्वयाने उड्डाणपुलाचे काम मार्गी लावावे, जेणेकरून प्रवाशांची इंधन आणि वेळेची बचत होईल, अशी भावना स्थानिक वाहनधारकांनी व्यक्त केली आहे.